Amarnath Yatra 2023 : 'जय बाबा बर्फानी'च्या घोषात 1 जुलैपासून सुरु झालेली पवित्र अमरनाथ यात्रा आज स्थगित करण्यात आली आहे. काश्मीरमधील खराब हवामानमुळे यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. बालटालमधील पवित्र अमरेश्वर धामची अमरनाथ यात्रा मुसळधार पावसामुळे थांबवण्यात आली आहे. कोणत्याही यात्रेकरूला पवित्र अमरनाथ गुहेकडे जाण्याची परवानगी नाही. काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा थांबवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. श्री अमरनाथ श्राइन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, हवामान पूर्ववत होईपर्यंत यात्रा स्थगित करण्यात आली आहे. हवामानात सुधारणा झाल्यावर यात्रा पुन्हा सुरू करण्यात येईल.
खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित
काश्मीरमधील अनेक भागात पावसामुळे शुक्रवारी अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, बालटाल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरील अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. आज कोणत्याही यात्रेकरूंना गुहेकडे जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, शुक्रवारी सकाळी मुसळधार पाऊस सुरू झाला, त्यामुळे यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली. यात्रेकरूंना बालटाल आणि नूनवान बेस कॅम्पवर थांबवण्यात आलं आहे.
खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा स्थगित
हवामानात सुधारणा होताच अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे 4.45 च्या सुमारास जम्मूतील बेस कॅम्पवरून 7,000 हून अधिक भाविकांची तुकडी अमरनाथ यात्रेसाठी रवाना करण्यात आली होती. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत 247 वाहनांतून भगवती नगर बेस कॅम्पवरून भाविक घाटीच्या दिशेने निघाले होते. तर, 4600 यात्रेकरूंना घेऊन 153 वाहनांचा ताफा पहलगामला जात होता. तसेच 2410 यात्रेकरूंना घेऊन 94 वाहनांचा दुसरा ताफा बालटाल बेस कॅम्पसाठी पहाटे 4.45 वाजता रवाना झाला होता.
यात्रेकरूंना बालटाल आणि नूनवान कॅम्पमध्ये थांबवलं
यावर्षी 1 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू झाल्यापासून जम्मू बेस कॅम्पवरून एकूण 43,833 यात्रेकरू घाटीकडे रवाना झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रेकरूंची संख्या 84,000 यात्रेकरुंनी आतापर्यंत अमरनाथ धामचं दर्शन घेतलं आहे. दक्षिण काश्मीर हिमालयातील 3,888 मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेची वार्षिक यात्रा अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम आणि गंदरबल जिल्ह्यातील बालटाल या दोन्ही मार्गांनी सुरू झाली. यंदा अमरनाथ यात्रा 62 दिवसांची असून 31 ऑगस्टला संपणार आहे.
सुरक्षेसाठी प्रशासनाची तयारी
अमरनाथ यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन आणि श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने सर्वतोपरी तयारी केली आहे. यात्रेकरुच्या आरोग्यासाठी दोन तात्पुरती रुग्णालये सुद्धा उभारण्यात आली आहेत. जागोजागी कडेकोड सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण यात्रेचा मार्ग आणि आजूबाजूच्या परिसरावर इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (ICCC) मधून लक्ष ठेवलं जात आहे. सुरक्षेसाठी यात्रामार्गावर ड्रोनमार्फत प्रशासनाची करडी नजर आहे.