Manish Sisodiya: आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodiya) आणि त्यांची पत्नी यांची एकूण 52 कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) (ED) जप्त केली आहे. या कारवाईबाबत तपास यंत्रणेकडून माहिती देण्यात आली आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना मद्य विक्री घोटाळा प्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून अटक करण्यात आली होती.
फेब्रुवारीमध्ये झाली होती सिसोदिया यांना अटक
आपचे नेते मनिष सिसोदिया यांना सीबीआयने 26 फेब्रुवारी रोजी अबकारी धोरण प्रकरणात अटक केली होती. सिसोदिया यांना नंतर याच प्रकरणाशी संबंधित एका प्रकरणात ईडीने अटक केली होती. चार दिवसांपूर्वी म्हणजेच 3 जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयानेही मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पत्नी सीमा सिसोदिया यांच्या प्रकृतीचे कारण देत सिसोदिया यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.
नेमकं काय आहे प्रकरण?
हे प्रकरण 2021 मध्ये सादर केलेल्या दिल्लीच्या नवीन दारू विक्री धोरणाशी संबंधित आहे (आता रद्द करण्यात आले आहे). केजरीवाल सरकारने 2021 मध्ये मद्यविक्रीसाठी नवीन धोरण तयार केले होते. ज्यामध्ये घोटाळा झाल्याचा विरोधकांनी आरोप केला होता. यासंबंधी वाद वाढल्यानंतर ते धोरण रद्दही करण्यात आलं होतं. दिल्ली सरकारने या धोरणातून उत्पन्नात लक्षणीय अशी 27 टक्के वाढ नोंदवली. ज्यामुळे सुमारे 8,900 कोटींचे उत्पन्न दिल्ली सरकारला मिळालं होतं.
याचदरम्यान दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आणि दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी या प्रकरणात गैरप्रकार झाल्याची भीती व्यक्त केली. या धोरणाविरोधात उपराज्यपालांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. गेल्या वर्षी सीबीआयने मनिष सिसोदिया यांच्या घरासह 31 ठिकाणी छापे टाकले होते. आता त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी यापूर्वीही अनेकांना अटक करण्यात आली आहे. ईडीच्या माहितीनुसार, मनिष सिसोदिया यांच्या 52 कोटी रुपयांच्या या मालमत्तेमध्ये त्यांची पत्नी सीमा सिसोदिया यांच्या दोन मालमत्ता आहेत. तर राजेश जोशी आणि गौतम मल्होत्रा यांच्या 7 कोटी 29 लाख रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे. यामध्ये 44 कोटी 29 लाख रुपयांच्या रोख रकमेचा देखील समावेश आहे.
त्यामुळे आता मनिष सिसोदिया यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं चित्र सध्या आहे. तसेच सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयामधअये दिलासा मिळणार का की त्यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे ही वाचा :
Odisha Rail Accident: ओदिशा रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई; तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक