श्रीनगर: नुकत्याच पार पडलेल्या जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत अब्दुला पितापुत्रांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने मोठा विजय प्राप्त केला होता. या निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स (National Conference) पक्षाने निवडणूकपूर्व युती केली होती. त्यामुळे आता जम्मू-काश्मीर सरकारमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे सत्तेत बसतील, हे जवळपास निश्चित होते. मात्र, आता जम्मू काश्मीरच्या राजकारणात (Jammu and Kashmir) नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेस (Congress) संधी असूनही नॅशनल कॉन्फरन्स पक्षासोबत सरकारमध्ये सामील होणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षाने अब्दुला पितापुत्रांच्या सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी काँग्रेस पक्ष सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सला बाहेरून पाठिंबा देईल. काँग्रेसच्या या निर्णयाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, यामुळे काश्मीरच्या राजकारणात एखादा नवा ट्विस्ट येणार का, हे पाहावे लागेल. ओमर अब्दुल्ला हे लवकरच जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. काँग्रेसने शुक्रवारी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या नेत्यांनी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला होता. यावेळी ओमर अब्दुल्ला यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि चार अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांसमोर सादर केले होते. 


आज जम्मू-काश्मीर सरकारचा शपथविधी होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत सकिना इटू, अली मोहम्मद सागर, हसनैन मसुदी, जावेद राणा, सैफउल्ला मीर आणि सुरिंदर चौधरी हे मंत्रि‍पदाची शपथ घेतील, असे सांगितले जात आहे. 


विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा?


जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल 7 ऑक्टोबरला जाहीर झाला होता. काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणूक झाल्याने जनमताचा कौल काय असणार, याला महत्त्व होते. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने 90 पैकी 42 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला होता. तर भाजपने जम्मू भागात मोठे यश मिळवत 29 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेस पक्षाला अवघ्या सहा जागा जिंकता आल्या होत्या. तर मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाचे फक्त 3 उमेदवार निवडून आले होते. सज्जाद लोण यांच्या पीपल कॉन्फरन्स, आप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला होता. तर 7 विधानसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार निवडून आले होते. यापैकी चार अपक्ष आमदारांनी नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा देऊ केला आहे. या आमदारांमध्ये प्यारेलाल शर्मा (इंदरवाल), सतिश शर्मा (चंबा), चौधरी मोहम्मद अक्रम (सुरणकोट), डॉ. रामेश्वर सिंह (बाणी) यांचा समावेश आहे.


आणखी वाचा


जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता, 49 जागांसह पूर्ण बहुमत, PDP चा सुपडा साफ