मुंबई : कलम 370 हटवल्यानंत पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सनं बाजी मारली आहे. 2014 मध्ये अवघ्या 15 जागा जिंकणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्सनं यावेळी तब्बल 42 जागांपर्यंत मजल मारली आहे. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीने 49 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे जम्मू -काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीचं सरकार सत्तेत येणार हे निश्चित झालंय. 


कुणाला किती जागा? 



  • काँग्रेस- नॅशनल कॉन्फरन्स - 49

  • भाजप - 29

  • पीडीपी - 03

  • इतर - 9 


काँग्रेसच्या जागा घटल्या, पीडीपीचा सुपडासाफ


काँग्रेस सत्ता स्थापन करणार असली तरी गेल्या वेळच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा जवळपास निम्म्यानं घटल्यात. गेल्यावेळी भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या मेहबुबा मुफ्तींच्या पीडीपीचा सुपडासाफ झाला. तर भाजपला चार जागांचा फायदा झालाय. पण भाजपनं जिंकलेल्या सगळ्या जागा या जम्मूमधल्या आहेत. काश्मीर खोऱ्यात भाजपला खातंही खोलता आलं नाही. विशेष म्हणजे भाजपचे जम्मू काश्मीर प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांचा नौशेरा मतदारसंघात पराभव झाला आहे. त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा दिला आहे.


महाराष्ट्रात जल्लोष


हरियाणात भाजपला घवघवीत यश मिळाल्यानं महाराष्ट्रात भाजपचा जल्लोष सुरू झालाय. हरियाणातल्या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढलाय. लोकसभेतल्या फेक नरेटीव्हचं उत्तर आता थेट नरेटीव्हनं दिलंय, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. आता महाराष्ट्रातही महायुतीचा असाच विजय होईल, असा भाजपला विश्वास वाटतोय. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर भाजपचा हरिणाच्या रुपानं पहिलाच मोठा विजय आहे. तसंच जम्मू-काश्मीरमध्येही भाजपची सत्ता आली नसली तरी तिथं त्याच्या जागांमध्ये मात्र वाढ झालीय.