नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election commision) गेल्या महिन्यात राज्यातील राजकीय पक्ष व विविध संस्थांशी चर्चा करुन विधानसभा निवडणुकांचा (Vidhansabha Election) आढावा घेतला होता. त्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठीची माहिती देत दिवाळीनंतर राज्यात निवडणुका होतील, असे संकेत दिले होते. तसेच, केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार (Rajeev kumar) यांनी राज्यातील मतदारांची संख्या, पुरुष, महिला, तृतीयपंथी मतदार आणि मतदारांमध्ये झालेल्या वाढीसंदर्भात माहिती देखील दिली होता. आता, नियोजित पत्रकार परिषदेतून आज राजीव कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन राज्यातील निवडणुकांची घोषणा केली आहे. गेल्या महिनाभरापासून राज्याचं लक्ष लागलेल्या निवडणुकांच्या घोषणेचा दिवस अखेर उजाडला असून महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे, आता दिवाळीनंतर पुन्हा एकदा दिवाळीसारखे फटाके फुटणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह झारखंड विधानसभा निवडणुकांचीही घोषणा केली आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर, 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे. राज्यातील 288 मतदारसंघात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून याच महिन्यात 29 ऑक्टोबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. म्हणजे, 15 दिवसांतच उमेदवारांना अर्ज भरण्याची तयारी करावी लागणार आहे. त्यातच, काही दिवसांपूर्वी नांदेड लोकसभा मतदारसंघातील खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं होतं. त्यामुळे, येथील मतदारसंघात लोकसभा पोटनिवडणुकीचीही घोषण करण्यात आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांप्रमाणेच लोकसभा पोटनिवडणुकांचंही वेळापत्रक असणार आहे. त्यानुसार, 20 नोव्हेंबर रोजी मतदान व 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होईल.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक
निवडणुकीचं नोटिफिकेशन - 22 ऑक्टोबर 2024
अर्ज भरण्याची तारीख - 29 ऑक्टोबर
अर्ज माघार घेण्याची तारीख - 4 नोव्हेंबर
मतदानाची तारीख - 20 नोव्हेंबर
मतमोजणी - 23 नोव्हेंबर
निवडणूक प्रक्रिया समाप्त - 25 नोव्हेंबर 2024
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक
अर्ज भरण्याची तारीख - 29 ऑक्टोबर
अर्ज माघार घेण्याची तारीख - 4 नोव्हेंबर
मतदानाची तारीख - 20 नोव्हेंबर
मतमोजणी - 23 नोव्हेंबर
झारखंड विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात
पहिला टप्पा 43
नोटिफिकेशन 18 ऑक्टोबर
अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 25 ऑक्टोबर
अर्जांची छाननी 28 ऑक्टोबर
अर्ज मागं घेण्याची तारीख 30 ऑक्टोबर
पहिला टप्पा मतदान 13 नोव्हेंबर
दुसरा टप्पा 38 जागा
निवडणुकीचं नोटिफिकेशन: 22 ऑक्टोबर 2024
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर
अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
मतदान : 20 नोव्हेंबर 2024
मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024
निवडणूक प्रक्रिया समाप्त: 25 नोव्हेंबर 2024
राज्यातील मतदारांची संख्या
निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. 9.63 कोटी मतदार असून 4.97 कोटी पुरुष मतदार तर 4.66 कोटी महिला मतदार आहेत. त्यामध्ये, 1.85 कोटी तरुण मतदार आहेत, यंदा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवयुवकांची संख्या म्हणजे नव मतदार 19.48 लाख एवढे आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून 10.77 लाख मतदार आहेत. राज्यात 100 वर्ष पूर्ण करणारे मतदार 47,776 आहेत. तर, 85 वर्षापेक्षा अधिक वय 42 लाख 43 हजार, तर 6.36 लाख दिव्यांग आणि 6,031 तृतीयपंथी मतदार आहेत.
राज्यांत एकूण पोलिंग स्टेशन 1 लाख 186 असणार आहेत.
शहरातील मतदान बुथ केंद्रांची संख्या 42,602 तर ग्रामीण भागात 57,582 बुथ केंद्र असणार आहेत. एका केंद्रावर मतदान 960, दिव्यांग सुविधा 299, महिला अधिकाऱ्यांमार्फत चालवलं जाणारी केंद्र मतदान केंद्र 388, तर मॉडेल मतदान केंद्र 530 असणार आहेत.
मतदारांसाठी सुविधा पोर्टल अॅप
निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने अॅप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणीं काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणुक आयोगाची टीम तिथं पोहचेल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
एटीएमसाठी पैसे घेऊन जाणाऱ्या वाहनांवर निर्बंध
एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणूक काळात रात्री 6 ते सकाळी 8 पर्यंत पैसे वाहतूक करता येणार नाही. राज्यातील पैसा, ड्रग्ज आणि दारुच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात येईल. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावर देखील लक्ष ठेवलं जाईल. 17 सी कॉपी पोलिंग एजंटला मतदान संपताच दिले जातील. यावर किती मतदान झालं याची माहिती असेल. सोशल मीडियात फेक, डीफ फेक प्रकार घडला तर कडक कारवाई होईल.
हेही वाचा
कर्मचाऱ्यांची 'दिवाळी'... मुंबई महापालिकेकडून दिवाळीसाठी 29 हजार रुपयांचा बोनस जाहीर