नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीच्या जामिया नगर परिसरात झालेला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोडीप्रकरणी पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे.  विशेष म्हणजे अटक केलेल्या आरोपींमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश नाही. अटक केलेले सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. दहापैकी तीन जण हे परिसरातील BC म्हणजेच बॅड कॅरेक्टर घोषित गुन्हेगार आहेत. दक्षिण दिल्लीच्या न्यू फ्रेण्ड्स कॉलनीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले होते.


नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात रविवारी (15 डिसेंबर) आंदोलन करताना न्यू फ्रेण्ड्स कॉलनीमध्ये काही समाजकंटकांनी उच्छाद मांडला. या आंदोलनादरम्यान तीन बस आणि इतर वाहनांची जाळपोळ करण्यात आली. इतकंच नाही तर आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या चार गाड्यांपैकी एक गाडीही पूर्णत: नष्ट केली. सोबतच इतर वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. या हिंसाचारात पोलिस दलातील दहा आणि अग्निशमन दलाचे दोन कर्मचारीही जखमी झाले होते.

सीसीटीव्ही आणि व्हिडीओ फुटेजच्या आधारे अटक
दिल्ली पोलिसांनी सोमवारी (16 डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, आंदोलनात स्थानिक सहभागी झाल्याने हिंसा वाढली. उच्छाद घालणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्ही आणि हिंसाचाराचे व्हायरल फुटेज तपासले. या फुटेजच्या आधारावरच दहा स्थानिकांना अटक करण्यात आली.

बनावट ओळखपत्र घेऊन समाजकंटक आंदोलनात घुसले?
पोलिसांना संशय आहे की, जामियाची बनावट ओळखपत्र बनवून काही लोक आंदोलकांमध्ये सामील झाले. हिंसा पसरवण्यात मोठा वाटा बनावट विद्यार्थ्यांचा होता. ताब्यात घेतलेल्या अशा 51 विद्यार्थ्यांची पोलिसांनी चौकशी केली. यापैकी 36 जणांना कालकाजीमधून आणि 15 जणांना न्यू फ्रेण्ड्स कॉलनी परिसरातून ताब्यात घेण्यात आलं होतं. पोलिसांनी त्यांना सोडलं आहे. आपण जामिया, डीयूच्या हिंदू कॉलेज आणि इग्नूचे विद्यार्थी असल्याचा दावा करत होते. यापैकी काहींनी जामीयाची बनावट ओळखपत्र बनवल्याचा संशय पोलिसांना आहे.

हिंसाचारानंतर जामिया कॅम्पसमध्ये समाजकंटक घुसले : पोलिस
हिंसाचारात विद्यार्थ्यांचा सहभाग नव्हता असं पोलिस आणि जामीया प्रशासन सुरुवातीपासूनच सांगत होते. हिंसाचारात बाहेरच्या लोकांचा समावेश होता, जे जाळपोळ, तोड़फोडीनंतर जामियाच्या क‌ॅम्पसमध्ये घुसले होते. त्यांना पकडण्यासाठी पोलिसही संध्याकाळी कॅम्पसमध्ये घुसले आणि विद्यार्थ्यांना मारहाण केली. परवानगीशिवाय कॅम्पसमध्ये घुसणे, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, वाचनालयात तोडफोड करणे आणि अश्रू धुराचे गोळे फेकण्याचा आरोपही पोलिसांवर आहे.

संबंधित बातम्या

Jamia Protests | हिंसेचा व्हिडीओ अक्षयकडून लाईक, नेटीझन्सनी झोडपल्यानंतर सारवासारव


Jamia Protests | जामिया विद्यापीठातील हिंसाचाराविरोधात प्रियंका गांधी यांच दिल्लीत धरणं आंदोलन