नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या पार्श्वभूमीवर काल (15 डिसेंबर) दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील हिंसाचारानंतर अलीगड मुस्लीम विद्यापीठातही मोठा गदारोळ पाहायला मिळाला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी अत्यंत हिंसक आंदोलन केले. आंदोलक विद्यार्थ्यांनी एक बसदेखील पेटवली. तर अलीगड मुस्लीम विद्यापीठात रविवारी संध्याकाळी विद्यार्थ्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करत दगडफेक केली. या गोंधळानंतर परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी 5 जानेवारीपर्यंत विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.


हिंसक आंदोलनांच्या केंद्रस्थानी असलेल्या जामिया मिलिया आणि अलीगड विद्यापीठाचा इतिहास
जामिया मिलिया इस्लामिया
उर्दूमध्ये जामिया म्हणजे विद्यापीठ आणि मिलिया म्हणजे राष्ट्रीय असा अर्थ आहे. त्यामुळे जामिया मिलिया इस्लामिया म्हणजेच राष्ट्रीय मुस्लीम विद्यापीठ. 1920 मध्ये ब्रिटीशांची भारतात सत्ता असताना अलीगडमध्ये जामियाची स्थापना झाली. मौलाना मोहम्मद हसन, मौलाना मोहम्मद अली जौहर आणि हकीम अजमल खान, डॉ. मुख्तार अहमद अन्सारी, अब्दुल माजीद ख्वाजा, डॉ. झाकीर हुसेन यांनी या विद्यापीठाची स्थापना केली.

1925 मध्ये जामिया अलीगडहून दिल्लीतल्या करोलबागेत हलवण्यात आलं. 1936 पासून आताच्या नव्या कँपसमधून जामियाचा कारभार चालत आहे. 2006 मध्ये सौदी अरबचे सुलतान मोहम्मद बिन सलमान यांनी जामियाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी जामियाला 3 मिलियन डॉलर देणगी दिली. त्यातून भव्य ग्रंथालय उभारण्यात आले आहे.

जामियाच्या अंतर्गत एकूण 9 महाविद्यालयं येतात. त्यामध्ये लॉ, इंजीनियरिंग, सायन्स, आर्ट्स, कॉमर्ससह इतर महाविद्यालयांचा समावेश आहे. जामियामध्ये एकूण 23 हजार 89 विद्यार्थी शिकतात. त्यामध्ये पदवीचे शिक्षण घेणारे 8 हजार 392 आणि पदव्युत्तर पदवीचे 3 हजार 874 विद्यार्थ्यांच्या समावेश आहे.

अलिगड मुस्लीम विद्यापीठाचा इतिहास
1875 मध्ये सर सईद अहमद खान यांनी उत्तर प्रदेशमधील अलीगडमध्ये या विद्यापीठाची स्थापना केली. अलीगडसह केरळच्या मलप्पुरम, प. बंगालच्या मुर्शीदाबाद आणि बिहारच्या किशनगंजमध्ये अलीगड विद्यापीठाचे तीन कॅम्पस आहेत. मोहम्म्द अली मोहम्मद खान आणि आगा खान यांनी विद्यापीठाच्या इमारतीच्या खर्चासाठी पैसे उभे केले.

अलीगड विद्यापीठामध्ये लॉ, मेडिकल, इंजिनियरींग आणि इतर महाविद्यालयांचे मिळून 18 हजार विद्यार्थी शिकतात. अलीगड हे पूर्णपणे रहिवासी विद्यापीठ आहे. या विद्यापीठात एकूण 100 हून अधिक वसतिगृहं आहेत.