मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात सुरु असलेल्या आंदोलनांनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याबद्दल ट्वीट करुन लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे. मोदींनी ट्वीट करुन म्हटले आहे की, ही शांतता टिकवून ठेवण्याची वेळ आहे. देशात एकता आणि बंधूभाव टिकवायला हवा. मी सर्वांना आवाहन करतो की, सर्वांनी या हिंसक आंदोलनांपासून दूर राहावे. तसेच लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात सुरु असलेल्या आंदोलनांवर नरेंद्र मोदींनी सुरुवातीला मौन बाळगले होते. त्यामुळे मोदींवर टीका सुरु होती. परंतु आज मोदींनी व्यक्त होण्यासाठी नेहमीप्रमाणे ट्विटरचा आधार घेतला आहे. मोदींनी आज दुपारी लागोपाठ पाच ट्वीट्स करुन नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे.
मोदींनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, सध्या आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आहे. देशाच्या विकासासाठी, सशक्त लोकशाही टिकवण्यासाठी, उपेक्षित आणि गरिबांच्या विकासासाठी आपण एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे.
नरेंद्र मोदींनी म्हटले आहे की, मी सर्व भारतीयांना आश्वस्त करु इच्छितो की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा भारतातल्या कोणत्याही नागरिकावर, कोणत्याही धर्माच्या व्यक्तीवर काहीही परिणाम होणार नाही. कुणालाही काळजी करण्याची आवश्यकता नाही. हा कायदा केवळ घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी आहे. तसेच हा कायदा भारताव्यतिरिक्त इतर देशात जागा नसलेल्या हिंदू, पारशी, जैन, शीख, ख्रिश्चन बांधवांना आपल्या देशाचं नागरिकत्व देण्यासाठी आहे.
मोदींनी म्हटले आहे की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 हा संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत झाला आहे. दोन्ही सभागृहातील खासदारांनी मोठ्या संख्येने त्यास पाठिंबा दर्शवला आहे. हा कायदा देशाच्या शेकडो वर्षांपासूनची संस्कृती, स्वीकृती, प्रेम, करुणा आणि बंधुतेचं प्रतीक आहे.