नवी दिल्ली : दिल्लीमधील जामिया विद्यापीठ आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठात करण्यात आलेल्या पोलीस कारवाईविरोधात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी निषेध व्यक्त केला असून इंडिया गेटवर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. प्रियंका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, ए के अँटनी यांच्यासहित अनेक ज्येष्ठ नेतेही आंदोलनाला बसले आहेत. प्रियंका गांधी जवळपास दोन तास ठिय्या आंदोलन करणार आहेत. देश गुंडांच्या मालकीचा नाही असं म्हणत प्रियंका गांधी आक्रमक झाल्या आहेत.


प्रियांका गांधींनी केलं ट्वीट

'पोलीस विद्यापीठात घुसखोरी करत असून विद्यार्थ्यांना मारहाण करत आहेत. सरकारने पुढे येऊन लोकांचं म्हणणं ऐकून घेणं अपेक्षित असताना भाजपा सरकार मात्र दिल्ली, उत्तर प्रदेश आणि ईशान्येकडील विद्यार्थी आणि पत्रकारांचा आवाज दाबत आहे. हे भ्याड सरकार आहे' असं ट्विट प्रियंका गांधी यांनी करत आपला निषेध व्यक्त केला आहे. तसेच आणखी एक ट्वीट प्रियांका गांधी यांनी केलं होतं. त्यामध्ये त्या म्हणाल्या होत्या की, सरकारला जनतेच्या आवाजाची भीती वाटत आहे. हुकूमशाहीच्या सहाय्याने सरकार तरुणांना दडपण्याचा प्रयत्न करत आहे', असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला होता.


दरम्यान, दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोनल सुरु आहे. या आंदोलनानं रविवारी हिंसक वळण घेतलं. आंदोलक विद्यार्थ्यांनी तीन बस आणि काही दुचाकी पेटवल्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त विद्यापीठ परिसरात तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आहे. आप नेते अमानुतुल्ला यांच्यावर हिंसा भडकावण्याच आरोप करण्यात येत आहे, मात्र त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या आसाम, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीमसह सात राज्यात प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. हे विधेयक संसदेत मांडल्यापासूनच याला विरोध सुरु झाला होता. विधेयकाच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर त्याची तीव्रता अधिक वाढली आहे.

अलीगड विद्यापीठ अनिश्चित काळासाठी बंद

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झडप झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अलीगड मुस्लीम विद्यापीठात तणाव वाढला होता. विद्यार्थ्यांनी केलेल्या दगडफेकीत काही सुरक्षारक्षकही जखमीही झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी विद्यापीठ परिसरातील सर्व रस्ते बंद केले होते. विद्यापीठातील एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन वातावरण शांत होईपर्यंत विद्यापीठ अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्व हॉस्टेल्सही खाली करण्यात येणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे प्राध्यापक अफीफ उल्लाह खान यांनी दिली.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर या विधेयकाला राष्ट्रपतींनीही मंजुरी दिली आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर आता नागरिकत्व संशोधन विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं आहे. या विधेयकामुळे अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातील सहा समुदायातील लोकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि इसाई या सहा समुदायातील लोक जे 31 डिसेंबर, 2014 आधी भारतात आले आहेत, त्यांना सरसकट भारतीय नागरिकत्व मिळणार आहे.

संबंधित बातम्या : 

नागरिकत्व कायद्याविरोधात अलीगड विद्यापीठात विद्यार्थांचं हिंसक आंदोलन, विद्यापीठ 5 जानेवारीपर्यंत बंद

CAB I ईशान्य भारतातील आग दिल्लीत; आंदोलकांनी जाळल्या तीन बस

Jamia Protest : विद्यार्थी आहेत म्हणून हिंसक आंदोलनाचा अधिकार नाही : सरन्यायाधीश

Jamia Protests | हिंसेचा व्हिडीओ अक्षयकडून लाईक, नेटीझन्सनी झोडपल्यानंतर सारवासारव