मुंबई : सप्टेंबर महिन्यात लॉन्च करण्यात आलेल्या आदित्य एल-1 (Aaditya L-1) बाबत मोठी माहिती समोर आली आहे. या मोहिमेबाबत इस्रोला (ISRO) कितपत यश मिळाले याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न सध्या आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष एस सोमनाथ (S.Somnath) यांनी सांगितले की, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताच्या पहिल्या अंतराळ मोहिमेचा एक भाग म्हणून प्रक्षेपित केलेले आदित्य L1 अंतराळ यान अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान हे यान L1 पॉइंटमध्ये 7 जानेवारी 2024 पर्यंत  पोहचू शकते. 


 विक्रम साराबाई स्पेस सेंटर येथे पहिल्या रॉकेट प्रक्षेपणाच्या 60 व्या वर्षाच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमाच्या वेळी इस्रो प्रमुखांनी ही माहिती दिली. दरम्यान L1 पॉइंटमध्ये प्रवेश करण्याची अंतिम तयारी सातत्याने सुरू असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली. 


7 जानेवारीला प्रवेश करण्याची शक्यता


आदित्य यान L1 पॉइंटमध्ये प्रवेश करण्याची अंतिम प्रक्रिया 7 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती इस्रो प्रमुखांनी यावेळी दिली. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) येथून आदित्य L1 चे 2 सप्टेंबर रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.


इस्रोच्या म्हणण्यानुसार, आदित्य-L1 125 दिवसांत पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर Lagrangian पॉइंट L1 भोवती प्रभामंडल कक्षेत प्रवेश करेल. L1 बिंदू हा सूर्याच्या सर्वात जवळचा मानला जातो. आदित्य एल1 ही सूर्याविषयी माहिती गोळा करुन घेण्यासाठी विविध प्रकारे वैज्ञानिक अभ्यास करेल आणि विश्लेषणासाठी त्याची छायाचित्रे पृथ्वीवर पाठणार आहे. 


फेब्रुवारीमध्ये सूर्याचे पहिले चित्र...


आदित्य-L1 वरून सूर्याचे पहिले चित्र फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मिळणार आहे. VELC ची निर्मिती भारतीय खगोल भौतिकी संस्थेने केली आहे. इस्रोच्या सन मिशनमध्ये स्थापित VELC सूर्याचे एचडी फोटो घेईल. L1 पर्यंतचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आदित्यचे सर्व पेलोड्स चालू होतील. म्हणजे त्यात बसवलेली सर्व उपकरणे सक्रिय होतील. त्यानंतर आदित्य सूर्याचा अभ्यास सुरू करेल. या दरम्यान, आदित्यवरील सर्व उपकरणे सुरळीतपणे सुरू आहेत की नाही, याची चाचणीदेखील इस्रोकडून करण्यात येणार आहे. 



आदित्य L-1 मध्ये विशेष यंत्रणा तयार करण्यात आली आहे, जेणेकरुन कोणत्याही परिस्थितीत यान सूर्याच्या कक्षात टिकू शकेल. आदित्य L-1 ची रचना खास प्रकारे करण्यात आली आहे, ते सूर्याच्या फार जवळ जाणार नाही, पण लॅरेंज पॉईंटवर  राहील आणि सूर्यावर संशोधन करेल. आदित्य L-1 ही एक प्रकारे स्पेस टेलिस्कोप आहे, जी स्पेसमध्ये खास पद्धतीने काम करेल.





हेही वाचा : 


Mann Ki Baat: पंतप्रधान मोदींनी 26/11 च्या हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना वाहिली श्रद्धांजली; 'मन की बात'मध्ये मोदी म्हणाले...