(Source: ECI | ABP NEWS)
ASI ने स्वतःवर गोळी झाडली, सुसाईड नोटमध्ये IPS वाय पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप, भ्रष्ट असल्याचा दावा
IPS Y Puran Kumar Case : आयपीएस पूरन कुमार हे भ्रष्ट होते आणि भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आपण बलिदान देत आहोत अशी चिठ्ठी लिहित हरियाणातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केली.

IPS Y Puran Kumar Case : हरियाणातील आयपीएस वाय पूरन कुमार यांच्या आत्महत्येच्या केसला आता वेगळंच वळण लागलं आहे. त्यांच्याशी संबंधित आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. रोहतक येथील सायबर सेलमध्ये तैनात असलेल्या एका सहाय्यक उपनिरीक्षकाने (ASI Suicide) स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. सतीश लाठर असं त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. घटनास्थळावरून पोलिसांना तीन पानांची सुसाईड नोट आणि एक व्हिडिओ मेसेज सापडला. मृत एएसआयने आपल्या सुसाईड नोटमध्ये दिवंगत आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Haryana ASI Suicide Case : पूरन कुमार भ्रष्ट असल्याचा दावा
आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय की, वाय. पुरण कुमार हे भ्रष्टाचारात सहभागी होते आणि जातीवादाचा फायदा घेऊन व्यवस्थेला हायजॅक करत होते. अटक होणार असल्याच्या भीतीने पूरन कुमार यांनी आत्महत्या केल्याचा दावाही या पत्रात करण्यात आला. भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आपण बलिदान देत असल्याचं त्या पोलीस कर्मचाऱ्याने लिहिलं आहे. या सगळ्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही त्याने केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत एएसआय हा आयपीएस वाय. पूरण कुमार यांचा बॉडीगार्ड सुशील कुमार याच्याशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणाच्या तपास पथकाचा भाग होता.
पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तर त्याने लिहिलेली सुसाईड नोट आणि व्हिडीओ फॉरेन्सिकने ताब्यात घेतलं आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमुळे आता पूरन कुमार प्रकरणाला आता वेगळं वळण मिळाल्याचं चित्र आहे.
IPS Y Puran Kumar Suicide : 14 अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल
हरियाणा कॅडरचे सीनियर आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांनी 7 ऑक्टोबर रोजी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्या प्रकरणात हरयाणाचे डीजीपी शत्रुघ्न कपूर आणि रोहतकचे एसपी नरेंद्र बिजार्निया यांच्यासह 14 अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. पूरन कुमार यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटच्या आधारे, चंदीगड पोलिसांनी सेक्टर 11 पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 108, 3(5) आणि एससी/एसटी कायद्याच्या कलम 3(1)(आर) अंतर्गत एफआयआर क्रमांक 156 नोंदवला आहे. पूरन कुमार यांच्या पत्नी अमनीत पी कुमार (Amneet P Kumar IAS) या आयएएस अधिकारी आहेत.
ही बातमी वाचा:
























