International Yoga Day 2022 : आज आंतरराष्ट्रीय योग दिवस... यंदा योग दिन (YOGA FOR CLIMATE ACTION) साजरं करण्याचं पाचवं वर्ष आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाचं मोठं महत्व आहे. भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या योगाला आज जगभरात मोठं महत्व मिळालं आहे. या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची (Yoga) सुरुवात 21 जून 2015 पासून झाली. या प्राचीन भारतीय पद्धतीला जगमान्यता, राज मान्यता मिळवून देण्यासाठी मोदी सरकारनं मोठा पुढाकार घेतला. 27 सप्टेंबर 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्र संघातील आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाची गरज व्यक्त केली. भारतातर्फे संयुक्त राष्ट्र महासभेत योग दिवसाची शिफारस केली. 193 पैकी 175 देशांनी प्रस्ताव तात्काळ स्वीकारला. एखादा प्रस्ताव एवढ्या कमी वेळेत म्हणजे 90 दिवसाच्या आत एवढ्या मोठ्या देशांनी स्वीकारण्याची पहिलीच वेळ होती.


शरीर निरोगी आणि मन शांत ठेवण्यासाठी जगभरातील बहुतेक लोक योगाचा अवलंब करतात. जगभरात योगाबद्दल जनजागृती करण्यासाठी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. आज मंगळवारी जगभरात आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. या दिवशी जगातील अनेक देशांतील लोक एकत्र येतात आणि योग दिवस साजरा करतात. देशभरात योग दिन यशस्वी करण्यासाठी विविध तयारी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे 75 मंत्री देशातील 75 विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणी योग करताना दिसणार आहेत. 


सन 2015 पासून 21 जून हा संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय 'योग दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी 21 जून 2022 ला आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षात येत असल्याने केंद्रीय आयुष्य मंत्रालयामार्फत देशभरातील 75 प्रसिद्ध स्थळांवर साजरा करण्यात येणार आहे. देशभरातील 75 प्रसिद्ध स्थळांमध्ये देशाचा मध्यभाग असणाऱ्या 'झिरो माईल्स'च्या नागपूरचीही  निवड झाली आहे. केंद्रीय दळवळण व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या मार्गदर्शनात नागपूरमध्ये भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या पुढाकाराने हा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात येत आहे. 


आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम


दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील भारतीय आयुष मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम निवडली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यावेळी 'योगा फॉर ह्युमॅनिटी' (Yoga For Humanity) ही आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम म्हणून निवडण्यात आली आहे. ज्याचा अर्थ मानवतेसाठी योग आहे.


2014 साली 11 डिसेंबरला संयुक्त राष्ट्र संघानं योगाचं महत्व मान्य करत 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची घोषणा केली. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्याने आणि सूर्याचं दक्षिणायन सुरु होण्याचा हा काळ असल्यानं या संक्रमण काळात योगाचा जास्त फायदा पोहोचतो म्हणून 21 जूनची निवड या दिवसासाठी करण्यात आली. 


आजच्या आधुनिक युगात, व्यग्रतेमध्येही योगासनं शरीर निरोगी आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. सर्व शारीरिक आणि मानसिक आजारांना शरीरापासून दूर ठेवण्यासोबतच योगाचा प्रत्येकाच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो. रोज योगासनं केल्यानं शारीरिक आणि मानसिक उर्जेच्या विकासासोबत तणाव आणि नैराश्यही कमी होतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


International Yoga Day 2022 : नायगारा धबधबा ठरला योगा उत्सवाचा साक्षीदार! 150 योगप्रेमींचा सहभाग