Pakistan Released 20 Fisherman : पाकिस्तानने 20 भारतीय मच्छिमारांची सुटका केली आहे.  भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी याबाबत माहिती दिली आहे. वाघा-अटारी बॉर्डर ट्रान्झिट पॉइंटवरून या मच्छिमारांना भारतात पाठवण्यात आले आहे. "पाकिस्तानने 20 भारतीय  मच्छिमारांची  सुटका केली आहे.  या मच्छिमारांनी त्यांची शिक्षा पूर्ण केली असल्यामुळे त्यांना मायदेशात परत पाठवले आहे, असे ट्विट उच्चायुक्तांनी केले आहे. 


उच्चायुक्त म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून हे मच्छिमार पाकिस्तानच्या तुरुंगात होते. हे सर्व मच्छिमार गुजरातचे रहिवासी आहेत. पाकिस्तानमध्ये या मच्छिमारांवर न्यायालयीन खटला चालवण्यात आला आणि त्यांना पाकिस्तानमध्ये 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. 


प्रसारमाध्यमांनी एका मच्छिमाराशी संवाद साधला तेव्हा तो म्हणाला, आम्ही चार वर्षांनी परत येत आहोत. पाकिस्तानात अडकलेल्या भारतीयांचीही सुटका झाली पाहिजे.  


या मच्छिमारांची शिक्षा संपल्यानंतर पाकिस्तानने त्यांना भारतात परत पाठवले आहे. ते अटारी सीमेवरून भारतात दाखल झाले. भारतात परतलेल्या सर्व मच्छिमारांची तपासणी केल्यानंतर गुजरात पोलिसांनी त्यांना गुजरातमध्ये प्रवेश दिला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 




दरम्यान, जानेवारी महिन्यातही  पाकिस्तानने 20 भारतीय मच्छिमारांची सुटका केली होती. या मच्छिमारांना पाकिस्तानातील कराचीच्या लांधी तुरुंगात ठेवण्यात आले होते. या मच्छिमारांना जिल्हा कारागृह आणि मालीर येथील सुधारगृहातून सोडण्यात आले. सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून त्यांना बीएसएफच्या ताब्यात देण्यात आले. या मच्छिमारांनी बेकायदेशीरपणे पाकिस्तानी सागरी क्षेत्रात घुसून परवानगीशिवाय मासेमारी केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती.