या सर्व प्रकाराबद्दल एकच शंका आहे ती म्हणजे जेव्हा जम्मू-काश्मिरमध्ये हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की कुठे होते? ज्यावेळी दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी पुलवामा हल्ला झाला त्यावेळी पंतप्रधान मोदी या कार्मक्रमाच्या चित्रिकरणात व्यस्त होते कारण त्या दिवशी संध्याकाळी 7 च्या सुमारास उत्तराखंडमधल्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधून मोदींना बाहेर पडताना पाहिलं गेलं.
डिस्कव्हरी वाहिनीच्या 'मॅन वर्सेस वाइल्ड' शोचा नुकताच जाहीर केलेला प्रोमो सर्व सोशल मीडिआवर शेअर होताना दिसतोय, स्वत: बेअर ग्रिल्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या कार्यक्रमाचा छोटा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मोदींच्या 14 फेब्रुवारीच्या दिनक्रमाबद्दल प्रश्न निर्माण होत आहे.
"180 देशातील नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसरी बाजू दिसणार आहे. वन्यजीवसंवर्धन आणि पर्यावरण परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांनी भारतातील जंगलांमध्ये जाऊन आव्हानात्मक काम केलं आहे", असं ट्वीट बेअर ग्रिल्सने केलं आहे.
पुलवामा हल्ला झाल्यानंतर बरेच तास पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कुणालाच ठावठिकाणा नव्हता, हल्ला झाल्यानंतर ताबडतोब सरकारने काहीतरी निर्णय घेणं अपेक्षित होतं मात्र सरकारला या हल्ल्याची तीव्रता समजली नव्हती, अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमातून व्यक्त होत आहेत. एवढा मोठा हल्ला झाल्यानंतरदेखील पंतप्रधान मोदींनी सदर कार्यक्रमाचे चित्रिकरण सुरुच ठेवले, यामागे नक्की काय कारण असावे असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.