Wrestlers Meeting With Amit Shah:  कुस्तीमहासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू (Wrestler Protest) आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचं चित्र सध्या आहे. माहितीनुसार, कुस्तीपटूंनी शनिवारी (3 जून) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी कुस्तीपटू आणि अमित शाह यांच्यामध्ये जवळपास दोन तास चर्चा सुरु होती. या भेटीदरम्यान कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्या चौकशी मागणी तर केलीच परंतु बृजभूषण सिंह यांना लवकरात लवकर अटक करण्याची देखील मागणी यावेळी कुस्तीपटूंनी केली. 


गृहमंत्री अमित शाह आणि कुस्तीपटू यांच्यामध्ये शनिवारी रात्री 11 वाजता भेट झाल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीमध्ये साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांचा समावेश होता. खाप पंचायतींनी जेव्हा केंद्र सरकारला 9 जूनपर्यंतचे अल्टिमेटम दिले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कुस्तीपटूंची भेट घेतली आहे. तसेच या भेटीमध्ये अमित शाह यांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता चौकशी करण्याचे आश्वासन कुस्तीपटूंना दिले आहे. 


गृहमंत्री अमित शाह यांनी दिले 'हे' आश्वासन 


या भेटीदरम्यान कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीचा जोर धरला. तसेच त्यांनी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी केली. त्यांनतर अमित शाह यांनी, "या प्रकरणात पोलीस योग्य ती चौकशी करत आहेत, तसेच कायदा योग्य तो न्याय नक्की करेल," असं आश्वासन कुस्तीपटूंना दिलं. परंतु जेव्हा कुस्तीपटूंनी लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी कुस्तीपटूंनी केली तेव्हा अमित शाह यांनी 'घाईत कोणताही निर्णय न घेता समजुतीने निर्णय घ्यावेत,' असा सल्ला देखील कुस्तीपटूंना दिला. 


पुढे बोलताना अमित शाह यांनी कुस्तीपटूंना विचारले की, "पोलिसांना योग्य चौकशी करण्यासाठी पुरेसा वेळ नको का द्यायला?" तर दुसरीकडे बजरंग पुनिया यांनी सोनीपत इथे जाऊन 'आता कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही' असं सांगितलं. 'लवकरच सर्व संघटनांना एकत्र बोलावून मोठी पंचायत घेतली जाईल', असं देखील बंजरंग पुनिया म्हणाले. 'तसेच तीन ते चार दिवसांत योग्य निर्णय घेतला जाईल', असं देखील त्यांनी सांगितलं. 


जंतरमंतर येथे सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला खाप पंचायत यांनी देखील आता पाठिंबा दर्शवला आहे. तसेच देशभरातून कुस्तीपटूंच्या आंंदोलनाला समर्थन दिले जात आहे. त्यामुळे आता केंद्रीय गृहमंत्री यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर तरी कुस्तीपटूंच्या मागण्या पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Wrestlers Protest: "सरकार कोणाचाच बचाव करत नाहीये..."; अखेर कुस्तीपटूंच्या आंदोलनावर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सोडलं मौन