Wrestlers Protest: देशभरातील खेळासारख्या अत्यंत पवित्र क्षेत्रात कार्यरत व्यक्तींचं खचलेलं मनोबल सावरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) खेळाडूंशी संवाद साधणार आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील खेळाडूंशी नेते संवाद साधणार आहेत, त्यासाठी 'खेळाडूंसोबत राष्ट्रवादी' या अभियानाची सुरुवात करत असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फेसबुक लाईव्हद्वारे केली. 


राष्ट्रवादीच्या या अभियानांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, तसेच सर्व नेते, पदाधिकारी हे त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील तालुका, जिल्हयातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय राज्य आणि जिल्हा पातळीवरील विशेष कामगिरी बजावलेल्या खेळाडूंसोबत संवाद साधणार आहेत.


राष्ट्रवादीचे पदाधिकारी विधानसभा मतदारसंघनिहाय आपापल्या भागातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा पातळीवरील सहभाग दाखवलेल्या आणि नोंदवलेल्या सर्व खेळाडूंची एकत्रित बैठक घेणार आहेत. शिवाय खेळाडूंच्या घरी जाऊन त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांचे मनोधैर्य वाढेल अशा पध्दतीने त्यांची मदत करणार आहेत, खेळाडूंशी संवाद साधणार आहेत.


सध्या राष्ट्रीय पातळीवर खेळाच्याबाबतीत ज्या घटना घडल्या आहेत, त्याची माहिती संबंधित खेळाडूंना देऊन त्यांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि अन्य पुरस्कार विजेत्यांना प्राधान्य दिलं जाईल. या बैठकीमध्ये झालेल्या संवादाची थोडक्यात माहिती राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात कळवली जाईल. खेळाडूंचे प्रश्न, समस्या आणि दिल्लीत झालेल्या घटनेबद्दल भारतातील खेळाडूंचं मनोधैर्य खचलं आहे, खेळाडूंशी यंत्रणा अशीही वागू शकते, याबाबतीत त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम करणार आहेत.


ज्या खेळाडूंची भेट घेतली जाईल त्यांचे फोटो आणि व्हिडीओ #NCPWithChampions या हॅशटॅगसह सोशल मिडियावर प्रसिद्ध केले जाणार आहेत. खेळाडूंसोबत बैठक 8 जूनच्या आतमध्ये घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील खेळाडूंपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते पोहोचूया, असा संकल्प करण्यात आला आहे. देशात आणि महाराष्ट्रात शरद पवारांनी नेहमीच खेळाडूंना आधार दिला आहे, त्याच पद्धतीने मनोधैर्य घसरलेल्या महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंचे मनोधैर्य उंचावण्याचे काम करुया, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे.


दिल्लीमध्ये राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंबाबत ज्या घटना घडल्या, त्यामुळे देशात एक प्रकारची अस्वस्थता पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच देशातील आणि महाराष्ट्रातील खेळाडूंबरोबर आहे. क्रीडा क्षेत्रात शरद पवारांनी रचनात्मक कार्य केलं आहे. क्रिकेट, खो-खो, कबड्डी, कुस्ती या क्षेत्रातील खेळाडूंशी संवाद साधत उत्तमोत्तम खेळाडूंना पुढे येण्याची संधी निर्माण करुन देण्याचं काम केलं आहे. अनेक कुस्तीगीर खेळाडूंना अडचणीच्या काळात पवारांनी मदत करुन हात दिला, कारण ते आपल्या देशाचे नावलौकिक वाढवतात. देशासाठी पदकं घेऊन येणार्‍या किंवा विशेष कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंकडे शरद पवारांचं नेहमीच लक्ष असतं, असंही जयंत पाटील म्हणाले. 


दुर्दैवाने दिल्लीत जो प्रकार घडतोय तो बघता महिला कुस्तीपटूंना फार वाईट वागणूक मिळत असल्याचं जयंत पाटील म्हणाले. त्याबद्दल त्यांनी तक्रारी केल्या, मात्र तक्रार घेतली गेली नाही आणि शेवटी कोर्टाने आदेश दिल्यावर तक्रार घेण्यात आली. देशातील कोणत्याही खेळाडूंवर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली नव्हती. गुन्हा दाखल करुनही कारवाई होत नाही, अशी खंत जयंत पाटलांनी व्यक्त केली. महिला कुस्तीपटूंवर शेवटी आंदोलन करण्याची वेळ आली. नवीन संसदेचं उद्घाटन होत असताना आंदोलन करणार्‍या महिला कुस्तीपटूंवरच कारवाई करण्यात आली. पदकं मिळवलेल्या या महिला कुस्तीपटूंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावून कौतुक केलं होतं. त्याच महिला कुस्तीपटूंवर भाजपच्या खासदारावर आक्षेप घेतले म्हणून कारवाई करण्यात आली, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस या मुद्द्याचं राजकारण करु इच्छित नाही, असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा:


Sharad Pawar: CM शिंदे यांच्या भेटीसाठी शरद पवार वर्षा बंगल्यावर दाखल; चर्चांना उधाण