(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चेन्नईत नॉन पिक अवरमध्ये सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु, मुंबईत कधी?
चेन्नईत आजपासून सर्वसामान्यांना नॉन-पीक अवरमध्ये लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. चेन्नईत लोकल सुरु झाल्यानंतर मुंबईत सरसकट सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार असा प्रश्न विचारला जात आहे.
मुंबई : चेन्नईमधील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण रेल्वेने 23 डिसेंबर म्हणजेच आजपासून सर्वसामान्यांना नॉन-पीक अवरमध्ये लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. दक्षिण रेल्वेने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "23 डिसेंबरपासून सर्वसामान्य नागरिकांना चेन्नईच्या उपनगरीय सेवेतील नॉन पीक अवरमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे."
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. "23 डिसेंबरपासून भारतीय रेल्वे सर्वसामान्यांना नॉन-पिक अवरमध्ये चेन्नईमधील उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देत. पुरेशा सुरक्षात्मक उपाययोजना केल्याने लोकांचा प्रवास सुखकर होईल, असं रेल्वेमंत्र्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
📣 From 23rd December, Indian Railways permits general public to travel by suburban train services in Chennai during non-peak hours. With adequate safety measures in place, this will greatly enhance ease of movement & passenger convenience. pic.twitter.com/IhD6dyQ14D
— Piyush Goyal (@PiyushGoyal) December 22, 2020
पहाटेपासून सकाळी सातपर्यंत, सकाळी साडे नऊ ते दुपारी साडेचार आणि संध्याकाळी सात ते शेवटची ट्रेन हे नॉन पिक अवर समजले जातील, असं रेल्वेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. दरम्यान नागरिकांनी प्रवासादरम्यान कोरोनाविषयक नियमावलीचं पालन करावं, असं आवाहनही रेल्वेच्या वतीने करण्यात आलं आहे.
अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांनाही पिक अवरमध्ये प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. सकाळी सात ते साडेनऊ आणि दुपारी साडेचार ते सात हे पिक अवर समजले जातील, असं रेल्वेने नमूद केलं.
दक्षिण रेल्वेने लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोविडविषयक मार्गदर्शक सूचनां पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
- मास्क न घालता स्टेशन परिसर आणि ट्रेनमध्ये येऊ नये
- ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना गर्दी करु नये
- स्टेशन परिसर आणि ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्स ठेवावा
- रेल्वे स्थानकांवर आणि प्रवासादरम्यान कागदपत्रे तपासण्यासाठी प्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं
मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार? एकीकडे चेन्नईत लोकल सुरु झाल्यानंतर मुंबईत सरसकट सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार असा प्रश्न विचारला जात आहे. मुंबईतील लोकल सेवा ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. परंतु मार्च महिन्यापासून बंद असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी पुन्हा कधी सुरु होणार असा प्रश्न मुंबईकर विचारत आहेत. मुंबईतही लोकल सेवा सुरु करण्यात आली मात्र ती फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी. त्यानंतर वकिलांना, शिक्षकांना संमती देण्यात आली. तसंच महिलांनाही नवरात्रीपासून लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. मात्र सर्वसामान्यांसाठी लोकल अजूनही सुरु झालेली नाही.
सगळ्यांसाठी लोकल सुरु करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र सरकारने केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना आणि रेल्वे मंत्रालयाला पत्रही लिहलं आहे. परंतु अद्यापही मुंबईत लोकल कधी सुरु होणार हे स्पष्ट झालेलं नाही. त्यातच आता चेन्नत उपनगरीय सेवा सुरु झाली आहे. त्यामुळे लवकरच मुंबईतील लोकल सेवाही सर्वसामान्यांसाठी सुरु होईल, अशी अपेक्षा मुंबईकर करत आहेत.