India Pakistan War: भारताच्या क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानचे 4 हवाई तळ उद्ध्वस्त केले, फायटर जेटसची धावपट्टी बेचिराख
India Attack on Pakistan army: पाकिस्तानकडून भारताच्या एकूण सहा हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले. यासाठी पाकने ड्रोनचा वापर केला होता. पाकिस्तानचा एकही हवाई हल्ला यशस्वी झालेला नाही.

India Pakistan War situation: भारताच्या लष्करी तळांवर शुक्रवारी रात्री सुपरसॉनिक क्षेपणास्त्रं डागणाऱ्या पाकिस्तानला भारतीय हवाई दलाने चांगलाच धडा शिकवला आहे. भारतीय वायूदलाच्या लढाऊ विमानांनी एअर स्ट्राईक (Air Strike) करुन पाकिस्तानी लष्कराचे चार हवाई तळ उद्ध्वस्त केले आहेत. यापैकी रहिम यार या हवाई तळावर भारताच्या फायटर विमानांकडून क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा करण्यात आला. यामध्ये रहीम यार हवाई तळाचे मोठे नुकसान झाले आहे. येथील विमानांसाठीची धावपट्टी क्षेपणास्त्रांमुळे पूर्णपणे बेचिराख झाली आहे. त्यामुळे आता या हवाई तळावरुन पाकिस्तानी लढाऊ विमानांना उड्डाण करता येणार नाही.
भारतीय वायूदलाची लढाऊ विमाने शनिवारी सकाळी पाकिस्तानमध्ये घुसली होती. या विमानांनी क्षेपणास्त्रांनी तीन ते चार हवाई तळांवर हल्ले केले आहेत. रावळपिंडीलगतच्या नूर खान हवाई तळाला भारताच्या लढाऊ विमानांनी लक्ष्य केले आहे. याशिवाय, मुरीद आणि सुकूर या हवाई तळांवरही भारतीय हवाईदलाच्या लढाऊ विमानांनी हल्ला चढवला होता. या हवाई हल्ल्यात पाकिस्तानचे खूप मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानच्या एअर डिफेन्स यंत्रणेला चकवा देऊन भारताची क्षेपणास्त्रे अचूकपणे जाऊन लक्ष्यावर आदळली. हे भारताच्यादृष्टीने खूप मोठे यश मानले जात आहे. यानिमित्ताने भारतीय हवाई दल पाकिस्तानपेक्षा किती सरस आहे, हे दिसून आले आहे.
याशिवाय, पाकिस्तानच्या सरगोधा हवाई तळावरही काहीवेळापूर्वी मोठा स्फोट झाला आहे. तसेच भारतीय सैन्याकडून सियालकोटमधील लुनी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आला आहे. यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.
पाकिस्तानकडूनही भारताच्या एअर बेसवर हल्ला
पाकिस्तानकडून शुक्रवारी रात्री भारताच्या हवाई तळांवर हल्ले करण्यात आले होते. पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला होता. यामध्ये पाकिस्तानच्या फतेह-1 या क्षेपणास्त्राचाही वापर करण्यात आला. जम्मू एअर बेस,उधमपूर एअर बेस, पठाणकोट एअर बेस, श्रीनगर एअर बेस आणि बियास या हवाई तळांवर पाकिस्तानी ड्रोन्सचा हल्ला झाला होता.
पाकिस्तानचा अमृतसरमधील भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला
पाकिस्तानी सैन्याने शनिवारी पहाटे पंजाबच्या अमृतसर येथील लष्करी छावणीवर ड्रोन हल्ला केला. पाकिस्तानची जवळपास 5 ड्रोन या परिसरात शिरली होती. मात्र, भारताच्या एल 70 एअर डिफेन्स गनने पाकिस्तानचे ड्रोन पाडल्याची माहिती भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.
आणखी वाचा
भारत विरोध करत राहिला, पण IMF ने पाकिस्तानला 8 हजार कोटी दिले; पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले...
























