Pulwama Attack : 2019 मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेलं रसायन हे अॅमेझॉनवरुन मागवण्यात आलं होतं, असा दावा कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं केला आहे. आऊटलूक इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखावर बोट ठेवत व्यापारी संघटनांनी अॅमेझॉनवर निशाणा साधला आहे. पुलावमा हल्ल्यासाठी अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आल्याचं तपासाअंती समोर आलं आहे. अमोनियम नायट्रेटच्या खुल्या विक्रीवर भारतात निर्बंध आहेत. त्यामुळं अॅमोझॉनच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं केली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर अॅमेझॉन इंडियाची बाजू प्रतिक्षित आहे.
यापूर्वीही एनआयएकडून कारवाई
पुलवामा येथे गेल्या वर्षी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यात वापरण्यात आलेले केमिकल अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवरुन मागवलं असल्याचं समोर आलं होतं. पुलवामा हल्ल्यात इम्प्रोवाईज्ड एक्सप्लोझिव्ह डिवाईस (IED) बनवण्यासाठी ज्या केमिकलचा वापर केला गेला, ते केमिकल ऑनलाईन मागवलं होतं. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) याप्रकरणी दोघांना अटक केली होती.
काय घडलं होतं?
गेल्यावर्षी 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. 'जैश'चा पुलवामा येथील दहशतवादी आदिल अहमद दार याने हा हल्ला घडवला. आदिल हा काकापोरा येथील रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटकांनी भरलेल्या ज्या गाडीने जवानांच्या बसला धडक दिली, ती गाडी आदिल चालवत होता.
पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद
पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.