Varun Gandhi : पक्षनेतृत्वावर नाराज असलेले खासदार वरुण गांधी भाजपला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा आहेत. वरुण गांधी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. ममता बॅनर्जी आजपासून दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यांमध्ये ममता बॅनर्जी आणि वरुण गांधी यांची भेट होणार असल्याचं बोललं जातेय. या भेटीमध्ये वरुण गांधी टीएमसीमध्ये प्रवेश कऱण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून वरुण गांधी भाजपवर नाराज आहेत. त्यांनी अनेकदा जाहीरपणे भाजपवर टीकाही केली आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप सोडण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.  
 
गेल्या काही दिवसांपासून वरुण गांधी यांनी पक्षावरील आपली जाहीर नाराजी अनेकदा व्यक्त केली. सोशल मीडियावर वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या धोरणावर टीका केली. केंद्र सरकारकडून घेतले गेलेले निर्णय तसेच पक्षाच्या धोरणांविरोधात सातत्याने टीका करत आहेत. त्यामुळेच वरुण गांधी हे लवकरच भाजपाला रामराम करुन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  


खासदार वरुण गांधी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात आहेत. आजपासून तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, वरुण गांधी त्यांची भेट घेणार असून, त्यात तृणमूलमधील प्रवेशाबाबतची चर्चा पुढे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या कॅबिनेट विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने वरुण गांधी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच वरुण गांधी आणि त्यांची आई मनेका गांधी यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर काढण्यात आलं होतं. तेव्हापासून वरुण गांधी पक्षावर नाराज आहेत.


ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर –
29 नोव्हेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षांतील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या असून सत्ताधारी भाजपला घेरण्याच्या योजना आखल्या जात आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हिवाळी अधिवेशनापूर्वी तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आल्या आहेत. 22 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ममता बॅनर्जी विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. यामध्ये वरुण गांधी यांचेही नाव असल्याचं बोललं जात आहे.