मुंबई : उद्या 15 ऑगस्ट रोजी देशाचा स्वातंत्र्य दिन. देशभर स्वातंत्र्य दिनाचा उत्साह असतो, मात्र या दिवशी देशाच्या दुश्मनांकडून काही घातपाताच्या घटनांचा धोका देखील असतो. या पार्श्वभूमिवर देशातील महत्वाच्या शहरांमध्ये चोख बंदोबस्त करण्यात येतो. या स्वातंत्र्य दिनी मुंबईतील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, कोणताही घातपात घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी मिशन ऑलआउट काल रात्री पासून सुरू केले आहे. या मिशन अंतर्गत मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणत नाकाबंदी करण्यात आली आहे. छोट्या रस्त्यांवर पेट्रोलिंग देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मुंबईच्या वेशीतून आत येणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी केली जात आहे. मुंबईचे महत्त्वाचे प्रवेश द्वार असलेल्या आनंद नगर टोल नाक्यावर मुंबई पोलिसांची मोठी नाकाबंदी लावण्यात आली होती.प्रत्येक वाहन चालकांची चौकशी करून, कागदपत्रं तपासली जात होती.  


मुंबई पोलिसांचे प्रवक्ते  डीसीपी एस चैतन्य यांनी सांगितलं की, या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालयांची सुरक्षा वाढवली आहे. खासकरुन मंत्रालयात जिथं ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे तिथली सुरक्षा तगडी करण्यात आली आहे. चैतन्य यांनी सांगितलं की, कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी ज्या व्यक्तिवर संशय आहे त्या सर्व व्यक्तिंची तपासणी केली जात आहे. बॉम्ब  डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड (BDDS) सोबत सर्व महत्वाच्या परिसरांची पाहणी केली जात आहे. 


मुंबईच्या 94 पोलिस स्टेशन्सच्या सर्व अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे की त्यांनी हाय अलर्टवर राहावं. त्यांच्या परिसरात त्यांनी पेट्रोलिंग करावी. सोबतच  एंटी टेरर सेल (एटीसी) आणि बीट ऑफिसर यांना देखील माहिती काढण्यासाठी सांगितलं आहे.  


डीसीपी एस चैतन्य यांनी सांगितलं की, आमच्याकडे एक नाईट पेट्रोलिंग स्टाफ आहे तर एक गुड मॉर्निंग स्क्वॉड देखील आहे. आम्ही त्यांनाही अलर्टवर राहण्याबाबत सांगितलं आहे. कुणी संशयित दिसताच त्याची चौकशी करण्यास सांगितलं आहे. मुंबई पोलिसांची स्पेशल ब्रांच, क्राइम ब्रांच, प्रोटेक्शन अँड सेक्युरिटी (यात बीडीडीएस आणि क्यूआरटीका) या सर्व यंत्रणांना दक्ष राहण्याची सूचना देण्यात आली आहे.