India Heavy Rain : मुसळधार पावसामुळे उत्तर आणि पूर्व भारतात जोरदार पाऊस, पूर, भूस्खलन आणि घरांचे नुकसान झाले, परिणामी मान्सूनच्या पावसामुळे गेल्या तीन दिवसांत 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), उत्तराखंड(Uttarakhand) , ओडिशा (Odisha), झारखंडमध्ये (Jharkhand) 50 जणांना जीव गमवावा लागला. मृतांमध्ये 22 लोक एकट्या हिमाचल प्रदेशातील आहेत. उत्तराखंड-ओडिशामध्ये प्रत्येकी चार जणांचा मृत्यू झाला असून झारखंडमध्येही एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशातच, गेल्या 24 तासांत मुसळधार पावसामुळे भूस्खलन, पूर आणि ढगफुटीच्या घटनांमध्ये किमान 22 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांपैकी आठ जण एकाच कुटुंबातील आहेत. राज्यात झालेल्या या अपघातांमध्ये दहा जण जखमी झाले आहेत


मुसळधार पावसामुळे 'या' जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान
हिमाचल राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुदेश कुमार मोख्ता यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे मंडी, कांगडा आणि चंबा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. ते म्हणाले की, राज्यात गेल्या 24 तासांत हवामानाशी संबंधित 36 घटनांची नोंद झाली आहे. ते म्हणाले की मंडीतील मनाली-चंदीगड राष्ट्रीय महामार्ग आणि शोघीमधील शिमला-चंदीगड महामार्गासह 743 रस्ते पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. मंडी जिल्ह्याच्या उपायुक्तांनी सांगितले की, एकट्या मंडी जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे 13 जणांचा मृत्यू झाला तर सहा जण बेपत्ता झाले. राज्यातील कांगडा येथील चक्की पूल शनिवारी मुसळधार पावसामुळे कोसळल्याने पठाणकोट आणि जोगिंदरनगर दरम्यानची रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.


किती नुकसान झाले?


उत्तराखंडमध्ये, शनिवारी ढगफुटीच्या विविध घटनांमध्ये किमान चार जण ठार झाले, तर 10 बेपत्ता झाले. कारण पावसामुळे पूल वाहून गेले, घरांमध्ये चिखल आणि पाणी साचले. यामुळे अनेक गावांतील लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. अतिरिक्त पाण्याचे नुकसान पाहता वाहतुकीसाठी अनेक रस्ते बंद करण्यात आले होते, तर उत्तराखंडच्या पौरी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे आणि शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.



ओडिशात पुर परिस्थिती, सुमारे 4 लाख लोक 500 गावांमध्ये अडकले 


ओडिशाचे जलसंपत्तीचे मुख्य अभियंता बीके मिश्रा यांनी शनिवारी सांगितले की, काल रात्री बालासोर, केओंझार आणि मयूरभंजमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सुबर्णरेखा, बुधबलंग, बैतरणी आणि सालंडीमध्ये पाण्याच्या पातळीचे निरीक्षण केले जात आहे. झारखंडमध्ये शुक्रवारी संध्याकाळपासून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. शेकडो झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले आहेत, तर अनेक जिल्ह्यांत सखल भाग पाण्याखाली गेला आहे. पश्चिम सिंगभूम जिल्ह्यात शनिवारी सकाळी मातीची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पूर्व भारतातील काही भागांवरही पावसाचा परिणाम झाला आहे, ओडिशात पुर परिस्थिती आहे आणि सुमारे 4 लाख लोक 500 गावांमध्ये अडकले आहेत. यामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेजारच्या झारखंडमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. ओडिशाचा अधिक फटका बसला असून त्याच्या उत्तरेकडील भागात शुक्रवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे भुवनेश्वरच्या बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.


विविध शहरांमध्ये बराच काळ वीजपुरवठा खंडित 


मुसळधार पावसामुळे विविध शहरांमध्ये बराच काळ वीजपुरवठा खंडित झाला असून, नागरिकांना रस्त्यांच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. रांची येथील बिरसा मुंडा विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी दुपारी 2 वाजेपर्यंत खराब हवामानामुळे दोन उड्डाणे रद्द करण्यात आली. भारतीय हवामान खात्याने सांगितले की, रविवारी पश्चिम मध्य प्रदेशात आणि सोमवारी पूर्व राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


माता वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा टेकडीवर असलेल्या माता वैष्णोदेवी मंदिराची यात्रा आज सकाळी पुन्हा सुरू झाली कारण रात्रीची यात्रा मुसळधार पावसानंतर तात्पुरती स्थगित करण्यात आली होती.


संबंधित बातम्या


Himachal Landslide : हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर, पूर आणि भूस्खलन


Himachal Pradesh : हिमाचल आणि पंजाबला जोडणारा 800 मीटर लांबीचा रेल्वे पूल मुसळधार पावसाने कोसळला; अनेक गावांचा संपर्क तुटला