Turmeric War : 23 ऑगस्ट 1997 रोजी हळदीच्या (Turmeric) पेटंटबाबतचा अमेरिकेशी (America) चालू असलेला कायदेशीर लढा भारताने ( India ) जिंकला. या घटनेला आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे. 1995 मध्ये अमेरिकेतील मिसिसिपी विद्यापीठामधील दोन संशोधकांना हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर अमेरिकेत पेटंट मिळालं. त्यानंतर हळदीसाठी भारत आणि अमेरिका एकमेकांसमोर उभे राहिले. भारताने निकराने आपली बाजू मांडली आणि अखेर हा लढा जिंकत हळद ही भारताचीच असल्याचे संपूर्ण जगाला दाखवून दिले. भारतीय शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर (Raghunath Mashelkar) यांनी या लढ्यात खूप महत्वपूर्ण भूमिका निभावली होती.
भारताकडून हा खटला भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने लढला. त्यावेळी भारताने दावा केला होता की, हळदीचे अँटिसेप्टिक गुणधर्म भारताच्या पारंपारिक ज्ञानात येतात आणि त्यांचा उल्लेख भारताच्या आयुर्वेदिक ग्रंथातही आहे. यानंतर पीटीओने (PTO) 23 ऑगस्ट 1997 मध्ये दोन्ही संशोधकांचे पेटंट रद्द केले.
...आणि असा जिंकला लढा
मिसिसिपी विद्यापीठामधील दोन संशोधकांना हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर अमेरिकेत पेटंट मिळालं. इकडे भातात डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी वृत्तपत्रात याबाबतचं वृत्त वाचलं आणि त्यांना धक्काच बसला. माशेलकर त्यावेळी दिल्लीमध्ये सीएसआयआरचे (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) संचालक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी हळदीच्या या पेटंटच्या विरोधात लढा द्यायचं ठरवलं. आणि सीएसआयआरमधले शास्त्रज्ञ कामाला लागले. त्यासाठी हळदीचा हा गुणधर्म भारतातील लोकांना हे पेटंट फाईल होण्याआधीपासून माहित होता हे सिद्ध करणं गरजेचं होतं. सीएसआयआरने त्यासाठी तब्बल 32 संदर्भ शोधून काढले. हे सर्व संदर्भ संस्कृत, उर्दू आणि हिंदीमधील होते. यातील काही संदर्भ तर शंभर वर्षांपेक्षा जुने होते. त्यामुळे हे पेटंट अमेरिकन पेटंट ऑफिसने नाकारलं. एखाद्या विकसनशील देशाच्या पारंपरिक ज्ञानाला मान्यता देण्याच्या बाबतीत हळदीवरील पेटंटची केस हा एक मैलाचा दगड ठरला.
असे सांगितले जाते की, हा खटला लढण्यासाठी सीएसआयआरने त्यावेळी अमेरिकन वकिलाची नेमणूक केली होती. या केससाठी तब्बल 15 हजार डॉलर्स खर्च केले होते. सीएसआयआरने बरीच कागदपत्रे सादर केली होती जी अनेक सायन्स जर्नल आणि पुस्तकांमध्ये प्रकाशित झाली होती. याच कागपत्रांमुळे भारताची बाजू भक्कम झाली आणि हा लढा जिंकण्यास भारताला बळ मिळालं.
भारताने हा लढा जिंकला असला तरी या लढ्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे हळदीचं पेटंट अमेरिकेत फाईल करणारे संशोधक हरिहर कोहली आणि सुमन दास हे दोघेही भारतीय होते. अमेरिकन पेटंट कार्यालयात ते तपासणारा कुमार हा पेटंट परीक्षकही भारतीयच होता. आणि या अमेरिकी भारतीयांच्या विरोधात लढली भारतातली सीएसआयआर ही संस्था.
पीटीओचं कार्य काय?
पेटंट आणि ट्रेडमार्क ऑफिस (PTO) अर्थात पीटओ ही एजन्सी युनायटेड स्टेट्समधील ट्रेडमार्क आणि पेटंटशी संबंधित सर्व कायदे प्रशासित करण्यासाठी जबाबदार आहे. अनेक पिढ्यांचे उद्योजक आणि लहान व्यवसायांचे मालक तसेच मोठ्या कॉर्पोरेशन आणि विद्यापीठांसाठी ही एक महत्त्वाची एजन्सी आहे.
पेटंट जारी करून ही एजन्सी जगभरातील नवीन तंत्रज्ञानाचा शोध, गुंतवणूक आणि खुलासा करण्यासाठी प्रोत्साहन देऊन तांत्रिक प्रगतीला प्रोत्साहन देते. ट्रेडमार्कच्या नोंदणीद्वारे, ही एजन्सी व्यवसायांना त्यांच्या गुंतवणुकीचे संरक्षण, वस्तूंचा प्रचार आणि प्रोत्साहनासाठी मदत करते.