मुंबई : 'फोर्ब्स'च्या यादीत भारतातील अब्जाधीशांची संख्या वाढून 119 झाली आहे, जी अमेरिका आणि चीन या देशांना सोडून इतर सर्व देशांपेक्षा सर्वाधिक आहे. या 119 अब्जाधीशांची संपत्ती 440 बिलियन डॉलर म्हणजे 30 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. 1990 पूर्वी देशात फक्त दोन अब्जाधीश होते, मात्र 1991 च्या आर्थिक बदलांनंतर भारतीय अर्थव्यवस्थेने उसळी घेतली आणि 2016 पर्यंत अब्जाधीशांची संख्या 84 झाली.


या काळात अर्थव्यवस्था केवळ 2.3 ट्रिलियनची होती. हा आकडा चीनने 2006 मध्येच गाठला होता. मात्र चीनमध्ये तेव्हा केवळ दहा अब्जाधीश होते. पण भारताच्या त्या आकाराच्या अर्थव्यवस्थेत साडे आठ पट अधिक 84 अब्जाधीश होते. 2014 साली मोदी सरकारने काळा पैसा भारतात आणणं आणि गरीब-श्रीमंत यांच्यातली दरी कमी करणं हा अजेंडा बनवला होता. मात्र याउलट जालं. अब्जाधीशांची संख्या वाढून 84 हून 119 झाली. सोबतच नीरव मोदी, विजय मल्ल्या यांसारखे उद्योगपती बँकांना गंडवून पसार झाले.

2014 मध्ये भारतातील प्रतिव्यक्ती उत्पन्न 88 हजार 538 रुपये होतं. हे 2018 मध्ये वाढून एक लाख 12 हजार म्हणजे प्रति दिन प्रति व्यक्ती कमाई 306 रुपये आहे. यातलं धक्कादायक वास्तव म्हणजे सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशातील 29 कोटी नागरिकांची प्रति दिन कमाई 30 रुपयांपेक्षाही कमी आहे. यामुळेच मोठा वर्ग दारिद्र्य रेषेखाली येतो.

भारत या वर्षात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. याचवर्षी भारताने अर्थव्यवस्थेच्या बाबतीत फ्रान्सलाही मागे टाकलं. मात्र त्या फ्रान्सला मागे टाकल्याचं सेलिब्रेशन केलं जात आहे, ज्या देशाची लोकसंख्या केवळ 6.6 कोटी म्हणजे राजस्थानच्या लोकसंख्येएवढी आहे.