Coronavirus India : ओमिक्रॉनचे सावट पण देशातील कोरोनाबाधितांची संख्या घटतेय
Coronavirus Updates : देशभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या संकटाचे सावट असताना दुसरीकडे दिलासादायक बातमी समोर आली आहे.
Coronavirus India Updates : भारतात कोरोनाच्या संसर्गाचा जोर कमी होत असल्याची परिस्थिती आहे. कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे. नवीन कोरोनाबाधित आणि बाधितांच्या मृत्यू संख्येतही घट होत आहे. मागील 24 तासांत 6990 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 190 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तासांमध्ये 10 हजार 116 बाधितांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे.
देशभरात सध्या एक लाख 543 कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भारतात आतापर्यंत 1 अब्ज 23 कोटी, 25 लाख, 2 हजार 767 कोविड लशीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत तीन कोटी 40 लाख 18 हजार 299 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करण्यात आले. तर, चार लाख 68 हजार 980 लोकांचा कोरोनाच्या आजाराने मृत्यू झाला आहे. कोविड चाचणीवरही भर देण्यात येत आहे. मागील 24 तासांमध्ये 10 लाख 12 हजार 523 जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
सोमवारी, आठ हजार नवीन कोरोनाबाधित आढळले होते. तर, 9 हजारांहून अधिकजणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर, 236 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. कोरोना बाधितांची संख्या सातत्याने घटत आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईत कोरोना बाधितांमध्ये घट
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. सोमवारी, मुंबईत गेल्या 24 तासात 115 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तर 269 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,41,769 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात चार रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सोमवारी देण्यात आली होती. सध्या मुंबईत 2059 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 2647 दिवसांवर गेला आहे. सील केलेल्या इमारतींची संख्या देखील कमी झाली आहे. मुंबईतील सध्या 19 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही.