India Corona Cases Update : भारतात झपाट्यानं वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. भारतातील वाढणाऱ्या रुग्णसंख्येनं जगभरातील आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. जगभरात पहिल्यांदाच एका दिवसात सव्वा तीन लाख कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 314,835 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2104 रुग्णांनी जीव गमावला आहे. दरम्यान, 178,841 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी मंगळवारी देशात 295,041 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. दरम्यान, यापूर्वी अमेरिकेत 8 जानेवारी रोजी एका दिवसांत सर्वाधिक तीन लाख सात हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. 


देशातील आजची कोरोना स्थिती


एकूण कोरोनाबाधित रुग्ण : एक कोटी 59 लाख 30 हजार 965
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 34 लाख 54 हजार 880
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 22 लाख 91 हजार 428
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 1 लाख 84 हजार 657
देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 13 कोटी 23 लाख 30 हजार 644 डोस 


राज्यात काल विक्रमी 67,438 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ


महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे.  काल 67  हजार 468 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, काल 54 हजार 985 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 32 लाख 68 हजार 449 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 95 हजार 747 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.15 टक्के  झाले आहे.


राज्यात काल एकूण 568 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.54 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 61 हजार 911 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल नोंद झालेल्या 568 मृत्यूंपैकी 303 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 160 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 105 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत. 


'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्यात कठोर निर्बंध; शासनाकडून नवी नियमावली जारी


राज्यात आज (22 एप्रिल) रात्री आठपासून ब्रेक द चेन अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसेंदिवस राज्यातील रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. तसेच राज्यात ऑक्सिनज, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि बेड्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 'ब्रेक द चेन' अंतर्गत आज रात्री 8 वाजल्यापासून लागू होणारी सुधारित नियमावली प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमावलीमध्ये अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये लग्न समारंभ दोन तासात आटोपून केवळ 25 जणांच्या उपस्थित सोहळा पार पाडावा, नाहीतर 50 हजारांचा दंडाची आकारण्यात येणार आहे. तसेच राज्यांतर्गत प्रवासासाठी ई पास नाही पण फक्त अंत्यसंस्कार, मेडिकल इमर्जन्सी आणि अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवास करता येणार, असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :