नवी दिल्ली : देशासह राज्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. दररोज कोरोनाबाधितांची संख्या नवनवे उच्चांक गाठत आहे. सोबतच कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचे आकडेही वाढले आहे. लसीकरणाची मोहिम देखील देशात वेगाने सुरू आहे. तरी देखील अनेकांच्या मनात लसीबद्दल शंका आहे त्यामुळे लोकांच्या मनात आज देखील लस घ्यावी की नाही असा संभ्रम आहे. परंतु केंद्र सरकारने याविषयी आकडेवारी जाहीर करत हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्राने जाहीर केलेल्या या आकडेवारीनुसार कोरोनाविरुद्धची लस प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे.
भारतात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरु झाल्यानंतर आतापर्यंत 12.7 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. यासाठी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींचा वापर करण्यात आला आहे. लसीकरण मोहिमेत आतापर्यंत एकूण 1.1 कोटी कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात आलेत. कोव्हॅक्सिनचा पहिल्या डोस 93, 56, 437 जणांना दिल्यानंतर यातील 4 हजार 208 म्हणजेच 0.04 टक्के जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. तर दुसऱ्या डोसनंतर देखील 0.04 टक्के जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आकडेवारीवरुन समोर येत आहे. तर कोव्हिशिल्डचे आतापर्यंत एकूण 11.6 कोटी डोस देण्यात आले आहेत.
लस | पहिला डोस घेतलेल्यांची संख्या | पहिल्या डोसनंतर पॉझिटिव्ह | दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या | दुसऱ्या डोसनंतर पॉझिटिव्ह |
कोव्हॅक्सीन | 93, 56, 437 | 4208 (0.04%) | 17, 37, 178 | 695 (0.04%) |
कोव्हिशील्ड | 10, 03, 02, 745 | 17,145 (0.02%) | 1, 57,32,754 | 5014 (0.03%) |
कोव्हिशिल्डचा पहिला डोस 10 कोटी 3 लाख 2 हजार 745 जणांना दिल्यानंतर यातील 17 हजार 145 म्हणजेच 0.02 टक्के जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. महत्त्वाचं म्हणजे, कोव्हिशिल्डचा दुसऱ्या डोस घेतल्यानंतर 0.03 टक्के जणांना कोरोना झाला आहे. कोव्हिशिल्डचा दुसरा डोस एकूण 1 कोटी 57 लाख 32 हजार 754 जणांना दिल्यानंतर यातील 5 हजार 14 जणांना कोरोना झाल्याचं समोर येत आहे. दिलासादायक बाब ही आहे की लसीकरणानंतर कोरोना होणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट होते आहे. त्यात लस टोचल्यानंतर कोरोना होण्याचे प्रमाण देखील कमी आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढावा हीच एक अपेक्षा या आकडेवारीवरुन समोर येत आहे.
कोरोनाची पहिली लाट (2020) आणि दुसरी लाट (2021) अशी वयाची वर्गवारी केल्यानंतर काही गटात रुग्णांची वाढ झाली आहे. वयोगट 10-20 वर्ष, 30-40 वर्ष, 40-50 वर्षात कोरोनाच्या रुग्णांची किंचित वाढ झाल्याचं समोर आलं आहे. तर 50-60 वर्ष आणि 60-70 वर्ष वयोगटात देखील दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढली आहे. यात सर्वाधिक 30-40 वयोगटात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. ज्यात 2020 मध्ये 21.05 टक्के रुग्ण या वयोगटातील आढळून येत होते. तर आता 2021 मध्ये या वयोगटातील 21.15 टक्के रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे तिशी ते चाळीशीतील लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
देशात सध्याला 21.57 हून अधिक रुग्णांची संख्या बघायला मिळत आहे. ही संख्या मागील वर्षीच्या एकूण ॲक्टिव्ह रुग्णसंख्येच्या डबल झाली आहे. देशातील 146 जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट हा 15 टक्क्यांहून अधिक आहे. जो राज्य आणि केंद्र सरकारसाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे. पहिल्या लाटेत एका दिवसात 94 हजार सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, दुसऱ्या लाटेत रोजची वाढणारी रुग्णसंख्या 2.95 लाखांच्या घरात पोहोचली आहे.