नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांचा मोठा मुलगा आशिष येचुरी यांचं कोविड-19 मुळे निधन झालं. ते 34 वर्षांचे होते. स्वत: सीताराम येचुरी यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.


34 वर्षीय आशिष येचुरी यांना कोरोनाची लागण झाली होती. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात जवळपास दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आशिष यांच्या पश्चात कुटुंबात वडील सीताराम येचुरी, आई आणि धाकटी बहिण आहेत.


आपल्या ट्वीटमध्ये सीताराम येचुरी यांनी लिहिलं आहे की, "अतिशय दु:खाने सांगावं लागत आहे की, कोविड-19 मुळे मी आज सकाळी माझा मोठा आशिष येचुरीला गमावलं. ज्यांनी आम्हाला आशा दिली आणि ज्यांनी त्यांच्यावर उपचार केले...डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि आमच्यासोबत जे उभे राहिले, अशा सगळ्यांचे मी आभार मानतो."






 


दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री एके वालिया यांचं कोरोनामुळे निधन
दरम्यान याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए के वालिया यांच्या निधनाचं वृत्त आलं होतं. शीला दीक्षित सरकारमध्ये आरोग्य मंत्री असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एके वालिया यांचं आज सकाळी निधन झालं. वालिया यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 


देशभरात कोरोनाचा वाढता प्रकोप
देशात कोरोनामुळे परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या दीड कोटींच्या पार केली आहे. तर मृतांचा आकडा दोना लाखांच्या जवळ पोहोचला आहे. देशात सलग 43व्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ नोंदवली आहे. अनेक राज्यांमध्ये मेडिकल ऑक्सिजन, आयसीयू बेड्स तसंच रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यावरुन दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यावेळी हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यास सांगितलं होतं.