India China : जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी (China) यांनी केलेल्या वक्तव्यावर भारताने कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली. जम्मू-काश्मीरचा मुद्दा हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी स्पष्ट केले. भारताच्या भूमिकेनंतर आता चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांचा संभाव्य भारत दौरा रद्द होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भारत-चीन दरम्यान होणारी द्विपक्षीय चर्चा टळणार आहे.
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधून चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे काबूल येथे दाखल झाले. त्याआधी ते इस्लामाबादमधून दिल्लीत येणार होते. आता वांग यी हे काबूल येथून थेट काठमांडू येथे जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानमधील इस्लामिक देशांच्या बैठकीनंतर थेट भारतात येणार होते. दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येणार होते. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी 25 ते 27 मार्च दरम्यान काठमांडू दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केले होते.
लडाखमध्ये सुरू असलेला तणाव कमी करण्यावर भर देणे आवश्यक असून सीमावाद सोडवण्याच्या दृष्टीने ठोस भूमिका घेण्यात यावी अशी भूमिका भारताने व्यक्त केली. चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आल्यास लडाख तणावाच्या मुद्यावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भारत आणि चीनमध्ये लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशातील लष्करी पातळीवर चर्चेच्या 15 फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र, गलवान आणि लडाखमधील काही भागातून सैन्य माघारी घेण्याचा निर्णय झाला होता.
दरम्यान, भारतीय लष्कराने चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी एका उपग्रहाचा प्रस्ताव ठेवला होता, त्याला संरक्षण मंत्रालयाने (Defence Ministry) मंगळवारी मंजुरी दिली. संरक्षण मंत्रालयाने मोठी घोषणा करत भारतीय लष्करासाठी 4000 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या समर्पित उपग्रहाचा प्रस्ताव आहे. यामुळे लष्कराच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होणार असल्याची माहिती लष्करी सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha