India China : भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला तणाव कमी होत असल्याची चिन्हे दिसत आहेत. सन 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारत-चीनचे लष्कर युद्धासाठी सज्ज असल्याची परिस्थिती होती. आता मात्र, दोन्ही देशांमधील तणाव निवळत असल्याचे दिसत असून चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येऊ शकतात.


भारत आणि चीन दरम्यान लडाख पूर्व भागात दोन वर्षांपासून तणाव आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी काही परदेशी शक्ती भारत आणि चीनमधील तणाव वाढवत असल्याचे वक्तव्य केले होते. वांग यी यांचा हा भारत दौरा झाल्यास क्वॉड आणि युक्रेन युद्धाबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊ शकते. चीनचे परराष्ट्र मंत्री 26 मार्च रोजी नेपाळ दौऱ्यावर आहेत. त्याआधी वांग यी हे 24 ते 26 मार्च दरम्यान भारतात दाखल होऊ शकतात. हा दौरा झाल्यास त्याचे भूराजकीयदृष्टीय महत्त्व असणार आहे. 


भारत, रशिया आणि चीन या देशांचा समावेश असणाऱ्या आरआयसी गटाच्या या वर्षी होणाऱ्या बैठकीच्या अध्यक्षपदी चीन असणार आहे. सन 2020 नंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात काही वेळेस भेट झाली आहे. मात्र, या भेटी इतर देशांमध्ये झाल्या आहेत. 


गलवान हिंसाचारानंतर भारताने चिनी कंपन्यांवर मोठी कारवाई केली होती. टिकटॉकसह चीनच्या अनेक अॅपवर बंदी घालण्यात आली होती. भारताने चिनी कंपन्यांची करचोरीदेखील पकडली होती. 


चीनचे परराष्ट्र मंत्री नेपाळसह बांगलादेश, पाकिस्तानच्या दौऱ्यावर असणार आहे. त्यामुळे भारत दौरा केल्यास महत्त्वाचा ठरणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: