नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या हिंसक झडपेत भारताचे एकूण 20 जवान शहीद झाले आहेत. गेल्या 45 वर्षात असं पहिल्यांदा झालं आहे की, हिंसक झडपेत भारतीय जवानांना वीरमरण आलं आहे.


भारत-चीन सीमेवर 45 वर्षांपूर्वी 1975 साली चीनच्या हल्लात भारताचे 4 जवान शहीद झाले होते. त्यावेळी अरुणाचल प्रदेशमध्ये एलएसीवर ( लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल) गस्त घालणाऱ्या भारतीय सैन्यावर चीनी सैन्याने हल्ला केला होता.


त्याआधी 1967 मध्ये नाथु ला जवळ अशा प्रकारची घटना समोर आली होती, ज्यावेळी सीमेवर दोन्ही देशांचं सैन्य एकमेकांशी भिडलं होतं. सिक्कीममधील झटापटीमध्ये भारताची नियंत्रण रेषेवरील स्थितीमध्ये मजबुती हे महत्त्वाचं कारण होतं. 1962 च्या भारत-चीन युद्धानंतर भारत नाथु ला सीमेवर आपली स्थिती मजबूत करत होता. त्यामुळे चीनचा जळफळाट झाला. 1967 मध्ये भारताचे 80 जवान शहीद झाले होते. त्यावेळी भारतीय सैन्यानेही चीनला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. यामध्ये चीनच्या सैन्याचंही मोठं नुकसान झालं होतं. भारत आणि चीनमध्ये झालेल्या युद्धात चीनचे जवळपास 400 सैनिक मारले गेले होते.


भारत चीनमधील तणावाचं कारण एलएसी


भारत-चीन सीमेवर लदाखमध्ये गेल्या 40 दिवसांत तणावाची स्थिती कायम आहे. चर्चा होत आहेत, मात्र चीनकडून शब्द पाळले जात नाहीत. सैन्य स्तरावर बातचित सुरु आहे, तणाव शांत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भारत चीनमधील तणावाचं कारण एलएसी आहे. तसेच भारत-चीनमधील 1962 च्या युद्धानंतरची वास्तविक स्थितीही कारणीभूत मानली जात आहे. चीन आपल्या सैनिकांच्या तुकड्या पाठवून परिस्थिती बिघडवण्याचं काम करतो. चीनने मे महिन्यात सीमेवरील आपल्या हालचाली वाढवल्या. त्यामुळे दोन्ही देशाचं सैन्य एकमेकांसमोर आलं.





संबंधित बातम्या


India-China Face Off | जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, जशास तसं उत्तर देण्यास आम्ही सक्षम : पंतप्रधान