नवी दिल्ली : भारत आणि चीन सैन्याच्या जवानांनी पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तरेकडेल किनाऱ्यावरुन मागे येण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि चीन यांच्यात चर्चेच्या नवव्या फेरीत सहमती झाल्यावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिली आहे. तसेच द्विपक्षीय चर्चेत भारतानं काहीच गमावलेलं नाही, असे देखील सिंह म्हणाले.


राजनाथ सिंह म्हणाले, भारत आपली एक इंच भूमीही कोणाला घेऊ देणार नाही. सप्टेंबर 2020 पासून भारत आणि चीनमध्ये वाद निवळण्यासाठी चीनसोबत विविध स्तरावर चर्चा सुरु आहे. पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तरेकडील भागात सहमती झाली आहे. दोन्ही देशाच्या सैन्यांनी सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे. चीन फिंगर 8 आणि भारत फिंगर 3 या सीमेवर असेल. भारत-चीन सीमेवर पूर्वीसारखी स्थिती बनवण्यात येईल. सध्या पेट्रोलिंग बंद असेल. द्विपक्षीय स्तरावर चर्चेनंतरच एलएसीवर पेट्रोलिंग केलं जाईल. काही मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये मतमतांतर कायम असून त्यावर चर्चा सुरू आहे.


पाकिस्तानने बेकायदपणे भारताची भूमी चीनला दिली. त्याला आम्ही कधीच मान्यता देणार नाही. चीनने भारताच्या 43 हजार वर्ग किलोमीटर अशा मोठया भूभागावर दावा सांगितला आहे. पण आम्ही त्यांचे दावे कधीच मान्य केले नाहीत, असे देखील राजनाथ सिंह म्हणाले. एलएसीवरील आताची परिस्थिती बिघडणार नाही याची काळजी घेणार असून कुठल्याही स्थितीत तणाव निर्माण होईल असं वर्तन सैन्याकडून होणार नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले.


संबंधित बातम्या :



India-China Border | भारत आणि चीनचं एक पाऊल मागे, Pangong Tso Lake वरुन दोन्ही सैन्य मागे हटण्यास सुरुवात