नवी दिल्ली : गृह मंत्रालयात भारत-चीन सीमा व्यवस्थापनाबाबत बैठक सुरु असल्याची माहिती आहे. गृहसचिव ए के भल्ला यांच्या उपस्थितीत बॉर्डर मॅनेजमेंटच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरु आहे. या बैठकीत बॉर्डर रोड ऑर्गेनायझेशन, आयटीबीपी, सीपीडब्लूडी आणि गृह मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित आहेत. सीमेवर लवकरच रस्ते बांधणीचं काम पूर्ण केलं जाणार असल्याची माहिती या बैठकीतून मिळाली आहे. सीमेवरील 32 रस्त्यांचं काम लवकरच पूर्ण केलं जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने विस्तृत योजना आखली असल्याची माहिती आहे. गृह मंत्रालयात एकाच आठवड्यातील ही दुसरी बैठक आहे.

लेफ्टनंट जनरल स्तरावर दुसऱ्यांदा चर्चा होणार
दुसरीकडे भारत आणि चीनदरम्यान पूर्व लडाखमध्ये दोन्ही पक्षातील तणाव कमी करण्यावर चर्चा करण्यासाठी आज लेफ्टनंट जनरल स्तरावर दुसऱ्यांदा चर्चा होणार आहे. सरकारी सूत्रांनी सांगितलं की, पूर्व लडाखमध्ये चीनच्या सीमेतील चुशुल सेक्टरमधील मोल्डोमध्ये ही बैठक सकाळी 11.30 वाजता प्रस्तावित होती. भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व 14 कोअर कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह करत आहेत. लेफ्टनंट जनरल स्तरावरची पहिली चर्चा याआधी 6 जून रोजी झाली होती. त्यावेळी दोन्ही बाजूच्या संवेदनशील क्षेत्रातून सैनिकांना हटवण्याचा निर्णय घेतला होता.

आता पुन्हा भारत आणि चीनमध्ये आता कमांडर पातळीवर चर्चा केली जात आहे. ही बैठक प्रत्यक्ष ताबारेषेच्या पलिकडे चीनच्या भूमीत मोल्डो येथे होत आहे. त्यात लडाखमधील संघर्षाबद्दल चर्चा केली जाणार आहे.

दुसरीकडे भारत आणि चीनचे परराष्ट्र मंत्री देखील या मुद्द्यावर उद्या चर्चा करणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून उद्या दुपारी ही चर्चा होणार आहे. भारत आणि चीनमधील वादानंतर पहिल्यांदाच दोन देशांचे परराष्ट्र मंत्री चर्चा करणार आहेत.

भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव सुरु आहे. मागील सोमवारी गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले होते तर चीनचेही काही सैनिक मारले गेले होते.