मुंबई : सुरक्षित गुंतवणूक आणि परताव्याची हमी समजली जाणारी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीमवर पहिल्यांदाच सात टक्क्यांपेक्षा कमी व्याज होऊ शकतो. पुढील आठवड्यात तिमाहीचे दर निश्चित केले जाण्याची शक्यता आहे, त्यात पीपीएफचा व्याजदर सात टक्क्यांपेक्षा कमी केला जाऊ शकतो. पीपीएफचे व्याजदर सात टक्क्यांपेक्षा कमी होण्याची 46 वर्षांमधील ही पहिली वेळ आहे. याआधी 1974 मध्ये असं घडलं होतं. प्रत्येक तिमाहीच्या सुरुवातीला पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनासंह तमाम योजनांचे व्याजदर निश्चित केला जातो.


सध्या पीपीएफवर 7.1 टक्के व्याजदर मिळत आहे. एप्रिल ते जून तिमाहीसाठी हे दर मार्च महिन्याअखेरीच्या आठवड्यात निश्चित करण्यात आले होते. याआधी जानेवारीपासून मार्च महिन्याच्या तिमाहीमध्ये हा दर 7.9 टक्के होता. याशिवाय ज्येष्ठ नागरिक बचत योजनांच्या व्याजदरातही मोठी कपात झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना आपल्या बचतीवर 8.6 टक्क्यांऐवजी 7.4 टक्केच व्याज मिळत आहे.


तसंच नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेटच्या व्याजदरात वेगाने कपात होत 7.9 टक्क्यांपेक्षा कमी होऊन 6.8 टक्के झाली होती. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदरही 8.4 टक्क्यांऐवजी 7.6 टक्के झाला आहे. गुंतवणूक रक्कम दुप्पट करण्यासाठी चर्चेत असलेल्या किसान विकास पत्र योजनेवरही व्याजदर आता 6.9 टक्केच मिळणार आहे आणि याचा मॅच्युरिटी पीरियड वाढून आता 124 महिने झाला आहे.


कपात का होणार?
अल्प मुदत बचत योजनांचे व्याजदर सरकारी बॉण्ड यील्डशी संबंधित असतात. बॉण्ड यील्डमध्ये घसरणी झाल्यास अल्प मुदत बचत योजनांच्या दरात कपात होऊ शकते. जर दरांमध्ये अपेक्षेनुसार कपात झाली तर 1974 नंतर पीपीएफचा व्याजदर सात टक्क्यांपेक्षा खाली जाण्याची ही पहिलीच वेळ असेल. पीपीएफ दर दहा वर्षांच्या सरकारी बॉण्ड यील्डशी संबंधित आहे.


सरकारी बॉण्ड यील्डमध्ये घसरण?
1 एप्रिलनंतर दहा वर्षांच्या बॉण्ड यील्डचा सरासरी दर 6.07 टक्के राहिला आहे आणि सध्या हा दर 5.85 टक्के आहे. याचाच अर्थ अल्प मुदत बचत योजनांच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे. अशातच पीपीएफ, सुकन्या योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना यांसारख्या योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरात कपात होऊ शकते.