नवी दिल्ली : इंडिया आघाडीत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत दोन डझन पक्ष आणि नेते आहेत. या आघाडीत सगळेच नेते मोठे, दिग्गज मानले जाणारे. त्यामुळे प्रत्येकाचीच महत्वाकांक्षा मोठी. सगळ्यांच्याच मनात दिल्लीच्या तख्ताची आस. त्यात अंतर्विरोध सुद्धा खच्चून भरलेला. त्यामुळे इंडिया आघाडीचे नेतृत्व कोणी करायचे हा प्रश्न सुरुवातीपासून यक्ष प्रश्न बनलेला. आता हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेसच्या खराब कामगिरीनंतर पुन्हा त्या यक्ष प्रश्नानं डोकं वर काढलंय. काँग्रेसऐवजी ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचे नेतृत्व देण्याची चर्चा जोर धरु लागली आहे. ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचे नेतृत्व देण्याबाबत गांभीर्याने विचार होणार का, काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीत दुय्यम ठरणार हे येत्या काळातील राजकारण कशा पद्धतीने वळण घेतंय त्यावर अवलंबून असेल.
भाजपचा रथ रोखण्यासाठी लोकसभा निवडणुकीआधी इंडिया आघाडीनं दंड थोपटले. काँग्रेसच्या पुढाकारानं मोदीविरोधकांची मोट बांधली आणि इंडिया आघाडी जन्माला आली. लोकसभेनंतर सुस्त झालेल्या इंडिया आघाडीला हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर हादरे बसतायत. त्याचं कारण आहे आघाडीचं नेतृत्व कोण करणार हे.
आता काँग्रेसऐवजी ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीचं सारथ्य करण्यात इंटरेस्ट दाखवला. आघाडीतल्या अनेक पक्षांचा त्यांना पाठिंबा मिळाला आणि राजकारण पेटलं.
काँग्रेसला नेतृत्व जमत नसल्याचा आरोप
खरं तर इंडिया आघाडीची स्थापना झाली त्याच वेळी ममता बॅनर्जी आणि नितीशकुमार यांनी आपली हॅट रिंगणात टाकली होती. पण काँग्रेसने भिजत घोंगडं ठेवल्यानं तो निर्णय लांबत गेला आणि अखेर जुन्याजाणत्या मल्लिकार्जुन खरगेंकडे ही जबाबदारी गेली. पण दोन दिवसांपूर्वी ममता बॅनर्जींनी काँग्रेसला हे काम नीट जमत नसल्याचा आरोप केला आणि स्वत: त्याचं सारथ्य करण्याचे संकेत दिले. ममतादीदीच्या पक्षाचे खासदार कीर्ती आझाद यांनी स्ट्राईक रेटचा मुद्दा मांडत ममतादीदींचा दावा बळकट केला.
इंडिया आघाडीच्या नेतृत्व बदलाच्या चर्चेला हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेसची खराब कामगिरी हे सुद्धा एक कारण आहे. पण आता ममतादीदींच्या नावावरुन महाविकास आघाडीतले मतभेदही समोर आले.
पुढची पाच वर्ष केंद्रात सत्ता नाही, महत्त्वाच्या राज्यांमध्येही सत्ता नाही अशा स्थितीत इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांना एकत्र ठेवणं महाकठीण काम आहे. अशावेळी हे लोढणं गळ्यात टाकून घेणं ममतादीदींसाठी फायद्याचं राहिल का? काँग्रेसच्या पिढ्या राहुल गांधींना नेता म्हणून प्रोजेक्ट करण्यात खर्ची गेल्या आहेत. अशावेळी काँग्रेस आपला हट्ट सोडेल का? ममतांच्या नावासाठी इंडिया आघाडीतील इतर पक्ष त्याला तयार होतील का? ही ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासाठी इतरही कोणी खरंच इच्छुक असेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं किंवा त्यांचा अंदाज लावणंसुद्धा कठीण आहे.
ही बातमी वाचा: