मुंबई : कुर्ला परिसरामध्ये सोमवारी संध्याकाळी बेस्ट बस अपघाताची घटना ताजी असताना बेस्ट प्रशासनावर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. अशात मनसेने एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये बेस्ट बसचे कर्मचारी किती गंभीर आहेत याची प्रचीती येते. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत ओशिवरा भागात बेस्ट बस चालकाकडून वाईन शॉपवर बस थांबवून दारू घेताना मनसेकडून व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी बेस्ट बस चालकाचा दारू घेताना व्हिडिओ शेअर केला आहे. बेस्टचा बस चालकाने गाडी थांबवली आणि तो दारू घ्यायला वाईन शॉपवर गेला. तिथून दारू घेऊन तो परत आला आणि पुन्हा चालकाच्या सीटवर बसला. महत्त्वाचं म्हणजे त्या बसमध्ये प्रवासी बसल्याचं दिसतंय.
बेस्ट बस चालकांवर बेस्ट प्रशासनाचं नियंत्रण आहे का असा प्रश्न मनसेकडून करण्यात आला आहे. त्यासोबत वाईन शॉप वर बेस्ट बस थांबवून दारू घेणाऱ्या बस चालकाचा विरोधात काय कारवाई करणार असा सवालही मनसेने केला आहे.
अपघाताला जबाबदार कोण, ड्रायव्हर की बेस्ट प्रशासन?
मुंबईत कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये सोमवारी रात्री भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली. यात 7 जणांचा मृत्यू झालाय तर 48 जण जखमी झालेत. या अपघाताला नेमक जबाबदार कोण, ड्रायव्हर की बेस्ट प्रशासन असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आरोपी बसचालक संजय मोरे हा आधी कंत्राटी पद्धतीनं बेस्टमध्येच काम करायचा. त्याला 10 दिवसांपूर्वी पुन्हा कंत्राटी पद्धतीनं बेस्टच्या इलेक्ट्रिक बसवर ड्रायव्हर म्हणून घेण्यात आलं. पण त्यासाठी त्याला केवळ तीन दिवसांचं प्रशिक्षण देण्यात आलं. एवढं प्रशिक्षण पुरेसं आहे का, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे कंत्राटी भरतीला भाजपचा विरोध होता, पण आदित्य ठाकरेंच्या दबावामुळे बेस्टमध्ये कंत्राटी भरती सुरू झाल्याचा आरोप भाजपनं केला.
दरम्यान, कुर्ला अपघाताची चौकशी करण्यासाठी महापालिकेने एक समिती स्थापन केली असून त्याचा अहवाल दोन दिवसात सादर केला जाणार आहे.
ही बातमी वाचा: