Independence Day Celebration Live : देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन, वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
India Independence Day Celebration Live : यंदा भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या संदर्भातील प्रत्येक अपडेट येथे पाहा.
LIVE
Background
India Independence Day Celebration Live : भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर देशात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' (Azadi ka Amrit Mahotsav) साजरा केला जात आहे. स्वातंत्र्य दिनाआधीच संपूर्ण देश तीन रंगात न्हाऊन निघाला आहे. देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभरात ठिकठिकाणी तिरंगा रॅलीसह इतर देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
मुंबई पोलिसांच्या वतीनं आज 'आझादी की दौड' मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अभिनेता अक्षय कुमार यांची उपस्थिती होती. देवेंद्र फडणवीस आणि अक्षय कुमारने या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मुंबई पोलिसांची बाईक रॅली पाहायला मिळाली. दुचाकीस्वार पोलीस यावेळी तिंरगा घेऊ होते. यावेळी वाहतुकीच्या सर्व नियमांचं पालन करण्यात आलं. त्यानंतर या मॅरेथॉनला सुरुवात झाली.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याशिवाय ठिकठिकाणी तिरंगी सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे. तसेच राज्यातील मंदिरांमध्येही तिरंगी फुलांची सजावट आणि रोषणाई पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 13 ऑगस्टपासूनच देशात हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात झाली आहे. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात
भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनूसार हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत असून राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पंतप्रधान मोदींनी केलं होतं आवाहन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' या अभियानाची घोषणा केली होती. यावेळी देशभरातील जनतेला त्यांच्या घरावर किंवा कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये तिरंगा विक्रीही करण्यात आली.
Tiranga Rally : चेंबूरमध्ये काँग्रेसची तिरंगा कार रॅली
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. मुंबईत ठिक ठिकाणी भव्य तिरंगा शोभा यात्रा काढल्या जात आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभर 75 वा स्वातंत्र दिनाचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व मुंबई काँग्रेसचे प्रभारी चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर विधानसभा क्षेत्र अंतर्गत अमृत महोत्सव दिनानिमित्ताने "भव्य कार रॅलीचे" आयोजन आज करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये "राष्ट्रध्वजाची भव्य शोभा यात्रा" संपूर्ण चेंबूर येथे काढण्यात आली. यात चेंबूर मधील शेकडो नागरिक आणि कोंग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या मोटार कार घेऊन आणि त्यावर तिरंगा ध्वज लावून या शोभा यात्रेत सहभाग घेतला होता.
महिला सक्षमीकरणाचा संदेश देत आमदार राजेश पवारांची तिरंगा रॅली
नांदेड : देशाच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त "हर घर तिरंगा,घर घर तिरंगा" या उपक्रमा अंर्तगत जिल्ह्यातील उमरी येथे 370 फुटाचा भव्य तिरंगा हातात घेऊन तिरंगा रॅली काढण्यात आलीय. आमदार राजेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीत तब्बल तीन हजार मोटर सायकल स्वार व जवळपास 25 ते 30 हजार नागरिकांनी सहभाग घेतला. उमरी, धर्माबाद, बिलोली, नरशी व नायगाव असा तब्बल 100 किमीचा प्रवास करत ही रॅली काढण्यात आलीय. या रॅली दरम्यान देण्यात येणाऱ्या "भारत माता की जय, वंदे मातरम्" या घोषणाबाजीमुळे परीसर दुमदुमलाय. या माध्यमातून देश भक्तीचा एक अनोखा संदेश दिलाय. या रॅलीचे आयोजन नायगाव उमरी मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांच्या कडून करण्यात आले होते.
जालना : शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारला भारताचा नकाशा
स्वातंत्र्य दिनाची पूर्व तयारी म्हणून जालन्यातील तिर्थपुरी गावच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानावर कवायत केली. यावेळी त्यांनी भारताचा नकाशा साकारला. गावातील एस पी पाटील इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी अमृत महोत्सवाच्या निमिताने लहानग्या मुलांनी साकारलेला आपल्या देशाचा नकाशा आकाशातून अत्यंत सुंदर दिसत होता. त्याची ही ड्रोन कॅमेऱ्याने घेतलेली दृश्य.
पुणे : दौंडचे आमदार राहुल कुल यांनी बाईकवर तिरंगा रॅली काढली
भारत देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्यावर दौंडचे आमदार राहुल कुल यांनी बाईकवर तिरंगा रॅली काढली. राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली यवत ते केडगाव चौफुला अशी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. यावेळी 'भारत माता की जय' अशा घोषणा देण्यात आल्या.
पुणे : माळरानावरील पालावर राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण
हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा झेंड्याचे ध्वजारोहण केले. पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे एका मेंढपाळाने आपल्या माळरानावरील पालावर राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करून आपल्या आपले देश प्रेम व्यक्त केले. घर नसले तरी आपल्या राहत्या पालावर या मेंढपाळाने राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण केले. स्वातंत्र्याने पचाहत्तरी गाठल्यानंतरही भटक्या समाजातील लोकांपर्यंत विकास किती पोहचला माहित नाही. पण अशा या भटक्या मेंढपाळांनी मात्र आज रानातच आपल्या पालावरती डौंलामध्ये ध्वजवंदन केले.