Narendra Modi Speech Highlights : देशात एक देश एक निवडणूक धोरण राबवणे गरजेचे : नरेंद्र मोदी

PM Narendra Modi Speech Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशातील जनतेला संबोधित केले. त्यांनी देशाचा विकास, कायदे आणि नियमांतील बदल यावर भाष्य केलं.

प्रज्वल ढगे Last Updated: 15 Aug 2024 08:48 AM
Narendra Modi Speech Live Updates : देशातील प्रत्येक आस्थापनेनं वर्षात फक्त दोन धोरणात्मक बदल करावेत, नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावरून आवाहन

आपण बदलाबाबत बोलत आहोत. आज देशात साधारण 3 लाख वेगवेगळ्या संस्था काम करत आहेत. पंचायत समिती, नगरपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, राज्य, जिल्हा, केंद्र पातळीवर वेगवेगळ्या 3 लाख संस्था आहेत. मी या सर्व संस्थांना आवाहन करतो की, वर्षात आपल्या स्तरावर फक्त दोन बदल करा. कोणताही विभाग असो फक्त एका वर्षात दोन बदल करा. जनतेचं आयुष्य सुकर करणारे हे बदल हवेत. हे बदल प्रत्यक्ष राबवावेत. हे बदल प्रत्यक्षात आल्यास एका वर्षात 25 चे 30 लाख बदल घडून येतील. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल घडतील तेव्हा सामान माणसाचा विश्वास वाढेल. त्याची शक्ती राष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जाण्यास मदत होईल. त्यामुळेच या संस्थांनी बदल घडवण्यासाठी हिंमत करून पुढे यावे. सामान्य नागरिक जर पंचायत पातळीवर अडचणींचा सामना करत असेल तर त्या अडचणी दूर करायला हव्यात. 

Narendra Modi Speech Live Updates : सरकारला पत्र लिहून तुमच्या अडचणी सांगा, नरेंद्र मोदींचे जनतेला आवाहन

मी लोकप्रतिनिधींना आवाहन करतो की, आपण मिशन मोडवर इज ऑफ लिंव्हिंगसाठी काम केलं पाहिजे. मी युवक, प्राध्यापकांना आवाहन करतो की तुम्हाला येणाऱ्या छोट्या-छोट्या अडचणींबाबत सरकारला पत्र लिहा. या अडचणींवर असलेल्या उपयांबद्दल सांगा. कोणतेही कारण नसताना उभ्या राहिलेल्या या अडचणींविषयी सरकारला पत्राद्वारे सांगा. देशातील प्रत्येक सरकार संवेदनशील आहे. देशातील स्थानिक स्वराज्य संस्था असो, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार तुम्ही लिहिलेल्या पत्राची दखल घेतली जाईल, याचा मला विश्वास आहे. तुम्ही सरकारला सांगा की अमूक-अमूक गोष्टीची विनाकारण अडचण होती. ती दूर केली तर काहीही फरक पडणार नाही, हे पत्राद्वारे सांगा.  

Narendra Modi Speech Live Updates : छोट्या-छोट्या कारणांमुळे लोकांना तुरुंगात जायला लागायचे, ही परंपरा आम्ही नष्ट केली : नरेंद्र मोदी

लोकांच्या जीवनात सरकारचा हस्तक्षेप कमी असावा. आम्ही दीड हजारपेक्षा अधिक कायदे रद्द केले आहेत. कायद्याच्या कचाट्यात लोक अडकू नयेत म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. कायदा करताना झालेल्या चुकांमुळे लोकांना छोट्या-छोट्या कारणांमुळे लोकांना तुरुंगात जायला लागायचे. आता ही परंपरा आम्ही नष्ट केली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याकडे गुन्हेगारी कायदे होते. आता आम्ही न्यायसंहिता आणली आहे. आता दंड नव्हे तर न्यायाच्या भावनेला तयार केलं आहे.  

Narendra Modi Speech Live Updates : अंतराळ क्षेत्रातही आपण आज अनेक बदल, प्रायव्हेट सॅटेलाईट्स, रॉकेट्स लॉन्च होतायत- नरेंद्र मोदी

अंतराळ क्षेत्रातही आपण आज अनेक बदल झाले आहेत. अंतराळ क्षेत्र हे आपल्या भविष्याशी जोडलेले आहे. अंतराळ क्षेत्र अनेक बंधनांनी जखडलेले होते. आता हेच बंधन मुक्त करण्यात आले आहे. अंतराळ क्षेत्रात अनेक स्टार्टअप्स येत आहेत. अंतराळ क्षेत्र हे भारताला शक्तिशाली बनवण्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. आज प्रायव्हेट सॅटेलाईट्स, रॉकेट्स लॉन्च होत आहेत. नीती, धोरण योग्य असेल तर तसेच संपूर्ण समर्पणाची तयारी असेल तर योग्य परिणाम दिसून येतात, असे मोदी म्हणाले.

Narendra Modi Speech Live Updates : आज महिला स्वावलंबी होतायत, ही सामाजिक बदलाची गॅरंटी

गेल्य दहा वर्षात दहा कोटी महिला वुमन सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आल्या आहेत. याचा आम्हाला गर्व आहे. सामान्य कुटुंबातील दहा कोटी महिला आर्थिक दृष्टीने स्वावलंबी होत आहेत. जेव्हा महिला आर्थिक दृष्टीने स्वावलंबी होतात तेव्हा कुंटुंबात ती महिला निर्णय प्रक्रियेचा भाग होते. ही एक मोठ्या सामाजिक बदलाची गॅरंटी आहे. भारतातील सीईओ जगभरात नावाजले जात आहे. दुसरीकडे एक कोटी महिला लखपती दीदी झाल्या आहेत. आतापर्यंत 9 लाख कोटी रुपये महिला स्वयंसहायता बचत गटाला मिळाले आहेत. या मदतीमुळे महिला अनेक काम करत आहेत. 

Narendra Modi Speech Live Updates : आज प्रत्येक क्षेत्राला आधुनिकतेची गरज, देशात आधुनिक यंत्रणा उभी राहतेय : नरेंद्र मोदी

आज माझ्या देशातील तरुणाला हळूहळू चालायचं नाही. आज माझ्या देशातील तरुणाला थेट भरारी घ्यायची आहे. भारताचा हा सुवर्णकाळ आहे. त्यामुळे ही संधी आपल्याला गमवायची नाही. आपण याच संधीचा फायदा घेऊन स्वप्न आणि संकल्पाना घेऊन पुढे गेलो तर 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. एमएसएमई, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, कृषी अशा प्रत्येक क्षेत्रात नवी आणि आधुनिक यंत्रणा उभी राहात आहे. आपण आपल्या देशातील परिस्थितीनुसार पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक क्षेत्रात आधुनिकतेची गरज आहे. तंत्रज्ञानाची गरज आहे. आमच्या नव्या धोरणामुळे प्रत्येक क्षेत्रात या क्षेत्रांना तकद मिळत आहे.   

Narendra Modi Speech : बँकिंग क्षेत्रात आज मोठा बदल, बँकिंग मजबूत झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्थाही मजबूत- नरेंद्र मोदी

आज बदलाचा आमचा मार्ग विकासाची ब्लू प्रिंट झाली आहे. हा बदल, विकास फक्त वादविदाचा, वैचारिक लोकांच्या चर्चेचा विषय नाही. राजकारण डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे करत नाहीयोत. आमच्या नजरेत राष्ट्र सर्वप्रथम आहे. आपला देश महान व्हावा हाच उद्देश समोर ठेवून आम्ही काम करतो. बँकिंग क्षेत्राचा आज मोठा विकास झाला. अगोदर या क्षेत्राचा विकास हो नव्हता. आपल्या बँका संकटात होत्या. बँकिंग क्षेत्र मजबूत करण्यासाठी आम्ही अनेक बदल केले. जेव्हा बँक मजूबत असते तेव्हा अर्थव्यवस्थाही मजबूत होते. 

Narendra Modi Speech Live Updates : सामान्य नागरिकाला बदल हवा होता, हा बदल आम्ही प्रत्यक्षात आणला- नरेंद्र मोदी

देशात 'स्टेटस को'ची स्थिती झाली होती. आम्हाला या मानसिकतेला तोडायचे होते. मात्र लोकांना विश्वास द्यायचा होता. आम्ही त्या दिशेने प्रयत्न केला. अनेक लोक म्हणायचे की येणाऱ्या पिढीसाठी आतापासून काम करण्याची गरज काय आहे. पण देशातील सामान्य नागरिकाला हे नको होते. सामान्य नागरिकाला बदल हवा होता. या सामान्य नागरिकाच्या भावनांचा कोणी आदर केला नाही. या भावनांची कोणी दखल घेतली नाही. त्यामुळे हा माणूस बदलाची वाट पाहात होता. हीच जबाबदारी आम्हाला देण्यात आली. आम्ही अनेक बदल प्रत्यक्षात आणले

Narendra Modi Speech Live Updates : अगोदर दहशतवादी हल्ला करून अनेकांना मारायचे, आता देशाची सेना एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक करते- मोदी

कोरोना काळ कोणीही विसरू शकत नाही. आम्ही या काळात देशात सर्वाधिक वेगाने लसीकरण केले. भारतात अगोदर दहशतवादी येऊन अनेकांना मारून जायचे. आता देशाची सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक करते. यामुळे देशातील युवकांची छाती अभिमानाने फुगते. देशातील लोकांचे मन आज गर्वाने आणि आत्मविश्वासाने भरलेले आहे. 

Narendra Modi Speech Live Updates : प्रथामिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले, त्याचा फायदा वंचित वर्गाला होतोय- नरेंद्र मोदी

दलित, पीडित, आदिवासी, झोपड्यांत राहणारे लोकच या सर्व सोईसुविधांवीना जगत होते. आम्ही प्रथामिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याचाच फायदा या वंचित वर्गाला मिळाला आहे. व्होकल फॉर लोकलचा मंत्र दिला. व्होकल फॉर लोकल हा अर्थव्यवस्थेसाठी नवा मंत्र झाला आहे. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट हा प्रकल्प राबवला जातोय. अपारंपरिक उर्जेचा आम्ही संकल्प केला होता. अक्षय्य उर्जेसाठी जी-20 देशांनी जेवढे काम केले आहे, त्यापेक्षा अधिक काम भारताने केले आहे. भारताने ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी, ग्लोबल वार्मिंगच्या चितेंपासून दूर होण्यासाठी प्रयत्न केले आहेत.  

Narendra Modi Speech Live Updates : 12 कोटी कुटुंबांना जल जीवन मिशनअंतर्गत नळाद्वारे पाणी

जेव्हा लाल किल्ल्यावरून स्वच्छ मिशनवर बोललं जातं, तेव्हा गावात स्वच्छतेविषयी चर्चा होते. मी समजतो की हे भारतातील चेतनेचे प्रतिक आहे. 3 कोटी परिवार असे आहेत ज्यांना नळाद्वारे पाणी मिळते. जल जीवन मिशन अंतर्गत एवढ्या कमी वेळेत 12 कोटी कुटुंबांना जल जीवन मिशनअंतर्गत नळाद्वारे पाणी दिले जात आहे. आज 15 कोटी कुटुंब या योजनेचे लाभार्थी आहेत. 

Narendra Modi Speech Live Updates : ...तर 2047 पर्यंत भारताचे विकसित राष्ट्रचे लक्ष्य पूर्ण होऊ शकते : मोदी

आज देशातील 140 कोटी लोकांनी एक संकल्प केला. एक संकल्प घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला तर, खांद्याला खांदे लावून पुढे जाण्याचा निर्णय घेतला तर काहीही अडचणी आल्या तरी आपण प्रत्येक संकटावर मात करू शकतो. आपण भारताला समृद्ध करू शकतो. 2047 पर्यंत आपण भारताला विकसित राष्ट्रचे लक्ष्य पूर्ण करू शकतो. 

Narendra Modi Speech Live Updates : फक्त 40 कोटी लोकांनी जगातील महासत्तेला उलथून लावलं होतं- नरेंद्र मोदी

तेव्हाच्या लोकसंख्येनुसार देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी 40 कोटी लोकांनी स्वातंत्र्याचा लढा लढला. त्यांनी सामर्थ्य दाखवलं. त्यांनी एक स्वप्न उराशी बाळगलं. लढत राहिले. त्यांच्या मुखी वंदे मातरम् हा एकच स्वर होता. आम्हाला गर्व आहे की, आमच्यात त्यांचेच रक्त आहे. फक्त 40 कोटी लोकांनी जगातील महासत्तेला उलथून लावलं होतं.  

Narendra Modi Speech Live Updates : 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रमाच्या आधीही स्वातंत्र्याचा लढा नेटाने लढण्यात आला : नरेंद्र मोदी

नैसर्गिक संकटांमुळे आपली चिंता वाढत आहे. या नैसर्गिक आपत्तींमुळे अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे. संपत्तीचे नुकसान झालेले आहे. या सर्वांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. या संकटाच्या काळात देश त्यांच्यासोबत उभा आहे. आपला देश शेकडो वर्षांपासून गुलाम होता. हा काळ संघर्षाचा होता. शेतकरी, महिला, वृद्ध स्वातंत्र्याचा लढा लढत राहिले. 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रमाच्या आधीही आदिवासी क्षेत्रात स्वातंत्र्याचा लढा लढण्यात आला.

Narendra Modi Speech Live Updates : आजचा स्वातंत्र्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या देशप्रेमींना नमन करण्याचा दिवस : नरेंद्र मोदी

स्वातंत्र्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या देशप्रेमींना नमन करण्याचा आजचा दिवस आहे. संपूर्ण देश आज त्यांचा ऋणी आहे. देशभरातील असंख्य महापुरुषांना आज देश नमन करत आहे. 

Independence Day 2024 : लाल किल्ल्याच्या परिसरात हेलिकॉप्टद्वारे पुष्पवृष्टी

लाल किल्ल्यावर भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. लाल किल्ल्याच्या परिसरात भारती राष्ट्रध्वजावर तसेच ध्वजारोहणासाठी जमलेल्या जनतेवर वायूसेनेच्या लढाऊ हेलिकॉप्टर्सद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.

Independence Day 2024 : लाल किल्ल्याच्या परिसरात पावसाच्या सरी

लाल किल्ल्यावर काही क्षणात ध्वजारोहण होणार आहे. सध्या लाल किल्ला परिसरात पावसाच्या सरी बरसत आहेत. तरीदेखील लाल किल्ल्याच्या परिसरात जमलेल्या भारतीयांची गर्दी कायम आहे. 

Independence Day 2024 : जपानमध्ये भारतीय दूतावासात स्वातंत्र्यदिन साजरा

भारतीय स्वातंत्र्यदिन जपानमध्येही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जपानमधील भारतीय दूतावासात ध्वजारोहण करण्यात आले. 





Narendra Modi Speech Live Updates : सकाळी 7.30 वाजता ध्वजारोहण, 8.30 वाजता राष्ट्रगीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी 7.17 वाजता लाल किल्ल्यावर पोहोचतील. त्यानंतर त्यांना 7.19 वाजता  तिन्ही सैन्यदलाकडून गार्ड ऑफ ऑनर दिला जाईल. सकाळी 7.26 वाजता नरेंद्र मोदी तिन्ही सेनादलाच्या प्रमुखांना भेटणार. त्यानंतर सकाळी 7.30 वाजता नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतील. 7.33 वाजता मोदी लाल किल्ल्यावरून संपूर्ण देशाला संबोधित करतील. 8.30 वाजता राष्ट्रगीत होईल.

Narendra Modi Speech Live Updates : मोदी यांनी राजघाटावर जाऊन गांधीजींना केले अभिवादन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजघाटावर पोहोचले आहेत. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन गांधीजींच्या स्मृतींना अभिवादन केले. त्यानंतर आता नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्याकडे निघाले आहे.





Narendra Modi Speech Live Updates : नरेंद्र मोदी सलग 11 व्या वेळी करणार लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण

पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग  11 व्या वेळी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करणार आहेत. या ध्वजारोहण कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली असून लवकरच मोदी ध्वजारोहणाच्या ठिकाणी येणार आहेत. 





Narendra Modi Speech Live updates : अवघ्या काही क्षणांत ध्वजारोहण, राहुल गांधी, अमित शाह यांची उपस्थिती!

थोड्याच वेळात नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवणार आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या या पावन पर्वावर देशातील दिग्गज नेते दिल्लीच्या लाल किल्ल्यावर उपस्थित आहेत. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे लाल किल्ल्याच्या परिसरात आगमन झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील ध्वजारोहण परिसरात आले आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी हेदेखील ध्वाजारोहणाच्या ठिकाणी आलेले आहेत. थोड्याच वेळात नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर येणार असून त्यानंतर ध्वजारोहण होईल.

थोड्याच वेळात मोदी देशाला संबोधित करणार

नरेंद्र मोदी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित करणार आहेत. ते यावेळी भाषणात नेमकं काय बोलणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. लाल किल्ल्यावरून ते 11 व्या वेळी देशाचा तिरंगा फडकवणार आहेत. 

पार्श्वभूमी

मुंबई : आज संपूर्ण देशात 78 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी महाराष्ट्रात 'हर घर तिरंगा' मोहीम राबवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केल आहे. सध्या पूर्ण देशात भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.