Santosh Deshmukh Case : बीड (Beed) येथील मस्सोजाग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला (Santosh Deshmukh Murder Case) तीन महिने उलटून गेले आहेत. तरीही या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे (Krushna Andhale) हा संतोष देशमुखांच्या हत्येनंतर अजूनही फरार आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच कृष्णा आंधळेबाबत मोठी माहिती समोर येत आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळे याला नाशिकमध्ये बघितल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. या प्रकरणात सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केले असून मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला केले आहे. या प्रकरणात 9 आरोपी असून आठ जणांना अटक झाली आहे. मात्र, हत्येच्या गुन्ह्यात सहभागी असलेला कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. तीन महिन्यानंतर देखील पोलिस त्याला शोधू शकले नाहीत.
फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये?
आता संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला नाशिकमध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरच्या दत्त मंदिर परिसरात कृष्णा आंधळे उभा असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करून पोलीस खातरजमा करत आहेत. कृष्णा आंधळेने तोंडाला मास्क आणि कपाळी टिळा लावला होता, असे वर्णन स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. नागरिकांनी हटकल्यानंतर मोटारसायकल वरून तो पळून गेल्याचा दावा देखील स्थानिकांनी केला आहे.
संतोष देशमुख प्रकरणाची आज सुनावणी
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सध्या न्यायलयीन, एसआयटी आणि सीआयडी चौकशी सुरु असून एक आरोपी वगळता सर्व आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. खंडणीसाठीच ही हत्या घडवण्यात आली हे स्पष्ट झाले असून हत्येवेळीचे फोटो दोषारोपपत्रातून समोर आलेत. यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, आज बुधवारी (दि. 12) संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केज जिल्हा व सत्र न्यायालयात पहिली सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा