India Post Pin Code : आज आपला भारत देश स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरा करत आहे. या स्वातंत्र्यदिनी (Independence Day 2022), भारत आणखी एक महत्त्वाची कामगिरी साजरी करत आहे. खरंतर, देशातील पत्र, कुरिअर आणि इतर पोस्टल वस्तू पाठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'इंडिया पोस्ट'चा पोस्टल ओळख क्रमांक (पिन) आज 50 वर्षांचा झाला आहे. याची स्थापना 15 ऑगस्ट 1972 रोजी करण्यात आली होती.   


सहा अंकी कोड 'पिन कोड' (Pin Code) : 


भारतीय पोस्टचा पिन कोड हा भारतातील पोस्टल सेवेद्वारे क्रमांकन प्रणाली म्हणून वापरला जाणारा सहा अंकी कोड आहे. याला पिन कोड असे म्हणतात. पोस्टल ओळख क्रमांक पोस्टमनला पत्राचा पत्ता शोधून ते वितरित करण्यास मदत करतो. पिन कोड प्रणाली राम भिकाजी वेलणकर यांनी देशात सुरू केली.


भिकाजी वेलणकर हे केंद्रीय दळणवळण मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. तसेच ते पोस्टल आणि टेलिग्राफ बोर्डाचे वरिष्ठ सदस्य होते. संस्कृत भाषेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वेलणकर हे प्रसिद्ध संस्कृत कवी होते. 1999 मध्ये मुंबईत त्यांचे निधन झाले. 


पिन कोडची गरज का आहे?


पिन कोडची आवश्यकता पाहिल्यास, याचे अनेक फायदे दिसून येतात. संपूर्ण भारतातील अनेक ठिकाणांच्या नावांच्या डुप्लिकेशनमुळे, पिन कोडची आवश्यकता सुरू झाली. ठिकाणे आणि नावांच्या दुहेरीमुळे पत्रे पाठवणे कठीण झाले. लोक वेगवेगळ्या भाषांमध्ये पत्ते देखील लिहितात, ज्यामुळे पत्ता शोधणे खूप कठीण होते. मात्र, जेव्हापासून पिन कोड सिस्टम सुरु झाल्यानंतर पोस्टमनना योग्य लोकांपर्यंत पत्र पोहोचविण्यात मदत झाली.


पिन कोडचा पहिला अंक झोन दर्शवतो, दुसरा सब-झोन दर्शवतो आणि तिसरा, पहिल्या दोनसह, त्या झोनमधील वर्गीकरण जिल्हा सूचित करतो. तर, शेवटचे तीन अंक जिल्ह्यातील वैयक्तिक पोस्ट ऑफिस दर्शवितात. इंडिया पोस्टनुसार, पोस्टल सेवा प्रदान करण्यासाठी संपूर्ण देश 23 पोस्टल मंडळांमध्ये विभागला गेला आहे. या प्रत्येक मंडळाचे प्रमुख पोस्टमास्तर जनरल असतात.


महत्वाच्या बातम्या :