PM Modi Independence Day Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात (PM Modi Speech) घराणेशाहीवर जोरदार हल्लाबोल केला. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी घराणेशाहीमुळे गुणवत्तेवर अन्याय केला असल्याचे म्हटले. राजकीय क्षेत्रातील घराणेशाहीचे प्रतिबिंब इतर क्षेत्रातही उमटत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. घराणेशाहीचा तिरस्कार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.


देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, गुणवत्तेवर अन्याय होत असल्याने घराणेशाहीचा तिरस्कार करणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, मी ज्यावेळी काका-पुतण्याशाही, घराणेशाहीबद्दल बोलतो तेव्हा लोकांना मी फक्त राजकीय क्षेत्राबद्दल बोलतोय असं वाटतं. दुर्देवाने राजकारणातील या घराणेशाहीची लागण देशातील इतर संस्थांमध्ये झाली असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. राजकारणाच्या बाहेरील घराणेशाहीमुळे देशातील गुणवत्तेचे नुकसान झाले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना आवाहन करताना म्हटले की, घराणेशाहीविरोधातील लढाईत युवकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. मी या विषयांवर चर्चा करू इच्छितो. अशा प्रकारची आव्हाने, आजाराविरोधात योग्य वेळी उपाययोजना न केल्यास हा आजार विक्राळ रुप धारण करू शकतो.


भ्रष्टाचारावर हल्लाबोल


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, भारतात एका बाजूला लोक गरिबीशी दोन हात करत आहेत. तर, दुसरीकडे काही लोकांकडे लुटीचा पैसा ठेवण्याची जागा नाही. आपल्याला भ्रष्टाचाराविरोधात लढावे लागणार आहे. जे लोक सरकारी बँकांचा पैसा लुटून गेले, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भ्रष्टाचार देशाला वाळवीसारखं पोखरत असल्याचे त्यांनी सांगितले. भ्रष्टाचाराविरोधात मला लढाई तीव्र करायची असून देशवासियांची यासाठी साथ हवी असल्याचे आवाहन त्यांनी केले. 


'मेड इन इंडिया' मोहिमेला चालना


देशाला आत्मनिर्भर बनण्याची गरज आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. टमेड इन इंडिया मोहिमेला चालना मिळाली आहे. यंदा स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षपूर्ती वेळी स्वदेशी 21 तोफांची सलामी देण्यात आली. आत्मनिर्भर भारत योजनेचा उद्देश जगाला भारताची ताकद दाखवणं आहे. जागतिक बाजारात स्वदेशीला स्थान मिळवून देणं आपलं ध्येय असेल.', असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.


'जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान' 


पंतप्रधान मोदी यांनी 'जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान'ची घोषणा केली आहे. लाल बहादूर शास्त्रींनी 'जय जवान, जय किसान'चा नारा दिला. यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी त्यात 'जय विज्ञान' जोडले. आणि आता त्यात 'जय अनुसंधान' जोडण्याची वेळ आली आहे. आता 'जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान', असा नारा पंतप्रधानांनी दिला आहे.