गोवा : गोव्यात होऊ घातलेल्या 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2021 साठी चित्रपटांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. दरवर्षी दिवाळीच्या सुमारास होणाऱ्या इफ्फीची कोरोनानंतर मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ह्यावर्षी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा दरम्यानच्या भारतीय पॅनोरमा विभागातील चित्रपटांची निवड जाहीर केली.


 IFFI (इफ्फी) दरम्यान 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन-फिचर फिल्म्स दाखवण्यात येणार आहेत. फीचर फील्म्समध्ये 25 पैकी 5 मराठी चित्रपटाचा ह्या यादीत समावेश आहे. एकूण 221 भारतीय चित्रपटांपैकी निवडक अशा 25 फीचर फिल्म्स निवडण्यात आली आहे. तर दुसरीकडे नाॅन-फीचर फिल्म्समध्ये 203 पैकी 20 नाॅन-फीचर फिल्म्स दाखवण्यासाठी निवड करण्यात आली आहे. 



20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. सेमखोर (दिमासा) ह्या भारतीय फीचर फिल्मने महोत्सवाची सुरुवात होणार आहे तर राजीव प्रकाश दिग्दर्शित ‘वेद...द व्हिजनरी’ हीओपनिंग भारतीय नॉन-फीचर फिल्म असणार आहे. 


मराठीतील एकूण सहा चित्रपटांचा समावेश आहे. ज्यात पाच फीचर फिल्म्स आहेत तर एक ही नॉन फीचर फिल्म असणार आहे. फीचरफिल्म्स ह्या प्रकारात निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित मी वसंतराव, अनंत महादेवन दिग्दर्शित बिटरस्वीट, निखिल महाजन दिग्दर्शितगोदावरी, विवेक दुबे यांचा फ्युनरल आणि मेहुल अगाजा यांच्या निवास ह्या मराठी चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. नॉन-फीचरमध्ये एकमेव मराठी ‘मुरमूर्स आॅफ द जंगल’चा समावेश आहे. 



गोवा राज्य सरकारच्या सहकार्याने तसेच भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या भारतीय चित्रपटमहोत्सव संचालनालयाकडून दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जात असतो. निवडलेले चित्रपट नोंदणी केलेल्या सर्वांना दाखवले जाणारआहेत. त्याचसोबत गोव्यात नऊ दिवस चालणाऱ्या चित्रपट महोत्सवात निवडक चित्रपटांचे प्रतिनिधी देखील हजर असतील.