Bihar liquor Deaths: बिहारमध्ये नावाला दारुबंदी आहे. येथे पुन्हा एकदा विषारी दारु पिल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. दोन दिवसांत बिहारमध्ये विषारी दारु पिल्यामुळे 31 जणांचा मृत्यू झालाय. विषारु दारुमुळे ऐन दिवाळीत अनेक कुटुंबं अंधारात गेली आहेत. गोपलगंजमध्ये 20 आणि बेतियामध्ये 11 जण दगावले आहेत. विषारी दारुमुळे अनेकांच्या डोळ्यांची दृष्टीही गेली आहे. विरोधकांनी यावरुन नितिश कुमार सरकारवर घणाघाती टीका केली आहे. गतवर्षी विषारी दारु पिल्यामुळे मुजफ्फरपूरमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता. 
बिहारमधील विरोधीपक्षनेते तेजस्वी यादव यांनी या मृत्यूला नितीश कुमार सरकारला जबाबदार धरलं आहे. तेजस्वी यादव यांनी ट्विट करत म्हटलेय की, ‘विषारी दारु पिऊन दिवाळीच्या दिवशी 35 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. बिहारमध्ये फक्त कागदावरच दारुबंधी आहे. अन्यथा खुली सूट आहे. कारण ब्लॅकमध्ये लूट आणि मौज आहे.’


बिहारमध्ये विषारी दारु पिल्यामुळे 31 जणांचा मृत्यू झालाय. यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही परतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, काहीही पिल्यामुळे असेच होईल. कितीही मनाई केली तरी विषारी दारु पिली जाते. 2016 मध्ये आम्ही सक्तीने दारुबंदी केली आहे. अनेक लोक दारुबंदीच्या बाजूनं आहेत. उर्वरित लोकांकडूनही सहकार्याची आपेक्षा आहे. जे दारु पितात त्यांनी पिऊ नये.' मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 'गडबड करणारे मोजकेच लोक असतात. त्यांना शिक्षा मिळते. तुरुंगातही जातात. लोकांना विनंती आहे की यापासून दूर राहा. दारुबंदीवर काही लोक माझ्या विरोधात बोलतात. पण चिंतेचं काही कारण नाही.'





एक एप्रिल 2016 मध्ये बिहारमध्ये दारुबंदी लागू करण्यात आली होती. 2015 मध्ये नितीश कुमार यांनी राज्यात दारुबंदी करु, असं सांगितलं होतं. त्यानुसार त्यांनी दारुबंदी केली होती. या कायद्यानुसार, दारु तयार करणे, विकणे, संग्रह करणे अथवा खरेदी कऱण्यावर बंदी आहे. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्याला 50 हजार रुपयांच्या दंडापासून 10 वर्षाच्या तुरंगावासाची शिक्षा आहे. दारुबंदीमुळे बिहार सरकारला प्रत्येकवर्षी 4000 कोटी रुपयांचं नुकसान होतं.