पेरियेरूम पेरूमल

विसरनाई

काला

सारपट्टा पेरुंबराई

असुरन

कर्णान

आणि आता 'जय भीम'.

जय भीम. असं कोणी चार चौकात बोललं तर अनेकांचे कान टवकारतात, नजरा बदलतात. अशा काळात 'जय भीम' हे सिनेमाचं टायटल ठेवणंच किती धाडसाचं आहे. तमिळ सिनेमा यासाठीच आवडतो. जे दाखवण्याची आणि ज्यावर बोलण्याची हिंमत बॉलिवूड करत नाही. ते प्रादेशिक सिनेमा त्यातही तमिळ सिनेमा ज्या आक्रमकतेनं आणि थेट व्यक्त होतोय, त्याचं कौतूक वाटतं. जातव्यवस्थेच्या सामाजिक असमतोलातून एका विशिष्ट समुहाला लक्ष्य केलं जाणंच किती वेदनादायी आहे.

 

उच्चवर्णिय आणि जमीनदारांना प्रशासनाची आणि पोलीसांची साथ मिळाल्यावर काय होते. खोट्या केसेस टाकून एका आदिवासी आणि मागासवर्गाची कशी पिळवणूक केली जाते हे अत्यंत धाडसानं कुठलीही भाडभीड न ठेवता दाखवलं गेलंय. हे सगळं बघताना अंगावर काटे येतात. त्यातले अत्याचार बघताना मी दोन वेळा मोबाईल बंद करून शांत बसून राहिलो. जर बघताना आपल्याला इतका त्रास होतो, तर ज्या लोकांनी हे सहन केलंय त्यांची काय अवस्था असेल विचार करा.

 

तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातल्या 1995 सालातल्या सत्य घटनेवर हा सिनेमा बेतलाय. रखडलेल्या खून, दरोडा, चोरीच्या केसेस पूर्ण करण्यासाठी थेट आदिवासींना उचलायचं, पोलीस कोठडीत त्यांना मार मार मारायचं, इतकं मारायचं की ते न केलेला गुन्हाही मान्य करतील. मग या केसेस सॉल्व्ह केल्याचं दाखवून आपलं काम वाचवायचं, वरिष्ठाची वाहवा मिळवायची आणि प्रोमोशनही घ्यायचं. या पोलिसी अत्याचाराला हा सिनेमा उघडं नागडं करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून दिलेल्या अधिकारांचा आणि हेबियस कॉर्पस कायद्यातली कलमं आणि त्याचा सुक्ष्म अभ्यास सिनेमाच्या निर्माणकर्त्यांनी केलाय.

 

मेनस्ट्रीम सिनेमातला सुपरस्टार सूर्या आणि ज्योतिका यांना या विषयावर करोडोंचा खर्च करून सिनेमा बनवावा हे वाटणं किती आशादायक आहे. महाराष्ट्रातही अशा कित्येक घटना घडलेल्या आहेत. त्यावर सिनेमा करावा असं आमच्या मेनस्ट्रीम कलाकारांना आणि दिग्दर्शकांना कधीच वाटलं नाही. गेल्या काही वर्षात काही सन्माननीय अपवादांनी ती हिंमत दाखवली. पण थेट बोलण्याची आणि त्यात सातत्य ठेवण्याचं काम जे तमिळ सिनेमा करतोय ते मराठीत होईल अशी अजूनही भाबळी आशा आहे. सिनेमा हे फक्त मनोरंजनाचं साधन आहे आणि आम्ही जीवावर उदार होऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करतो असं कलाकरांना वाटत असेल तर त्यापेक्षा दुर्दैव नाही. सिनेमा हे चळवळीचं काम करू शकतो हे तमिळ सिनेमानं दाखवून दिलंय.

 

सुपरस्टार सूर्या, प्रकाश राज, मनिकंदन, गुरू सोमसुंदरम, अभिनेत्री लिजो मोल जोस, राजिशा विजयन आणि सिनेमातल्या तमाम कलाकारांनी जबरदस्त काम केलंय. दिगदर्शक ज्ञानवेल यांनी हा सिनेमा अधिक प्रभावी केलाय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तंत्रज्ञांनी सिनेमात प्राण ओतलाय. सगळ्यांना 'जय भीम'