हैदराबाद : हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. तेलंगणा पोलिंनी चारही आरोपींचा खात्मा केला आहे. हैदराबादच्या राष्ट्रीय महामार्ग 44वर पोलिसांनी चकमकीत त्यांना कंठस्नान घातलं. यावेळी सायबराबाद पोलिसांचं नेतृत्त्व अशा व्यक्तीच्या हाती होतं, जे एन्काऊंटर स्पेशालिस्ट समजले जातात. ते आहेत सायबराबाद पोलिस आयुक्त व्ही सी सज्जनार. व्ही सी सज्जनार यांना 'एन्काऊंटर मॅन' नावानेही ओळखलं जातं.

हैदराबादमध्ये पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारुन व्ही सी सज्जनार यांना दीड वर्षच झाली आहेत. 14 मार्च 2018 रोजी त्यांनी सायबराबाद पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. व्ही सी सज्जनार हे 1996 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. कठोर आणि कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून त्यांची दलात ओळख आहे.

दिशा केस, 2019
हैदराबादमध्ये काही दिवसांपूर्वी दिशा (नाव बदलेलं आहे) महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाला आणि त्यानंतर आरोपींनी तिला जाळलं. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला. पण पोलिसांनी आठ ते दहा दिवसातच एन्काऊंटरमध्ये आरोपींचा खात्मा केला.

वारंगल केस, 2008
तेलंगणांच्या वारंगलमध्ये एका कॉलेज तरुणीवर अॅसिड हल्ला झाला होता, तेव्हाही मोठा वाद झाला होता. मात्र काही वेळातच तिन्ही आरोपींना एन्काऊंटरमध्ये कंठस्नान घालण्यात आलं. हे प्रकरण 2008 मधलं होतं. आरोपी काही काळापासून एका शाळकरी मुलीची छेडछाड करत होते. शाळेतून घरी येताना तिचा पाठलाग करत होते. मुलीने विरोध केल्याने संतापलेल्या आरोपींनी तिच्यावर अॅसिड हल्ला केला. यामध्ये मुलगी होरपळली. या घटनेवरुन त्यावेळच्या आंध्र प्रदेशात मोठा विरोध झाला होता. कोठडीत असताना तिन्ही आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला होता. पण काही दिवासातच वृत्त आलं की पोलिसांसोबतच्या एन्काऊंटरमध्ये त्यांचा मृत्यू झाला.

नक्षलवाद्यांचाही खात्मा
बलात्काराचे आरोपीच नाही तर अनेक नक्षलवाद्यांच्या एन्काऊंटर टीममध्येही त्यांचा समावेश होता.


एन्काऊंटरवर प्रश्न
दरम्यान आता या एन्काऊंटरची न्यायालयीन चौकशी होणार आहे. एन्काऊंटर करणं आवश्यक होतं की नाही, हे यामध्ये तपासलं जाईल. सुप्रीम कोर्टाच्या वकील वृंदा ग्रोवर यांनी पोलिसांवर खटला चालवण्याची मागणी केली आहे. पोलिसांवर खटला चालायला हवा आणि संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र न्यायालयीन तपास व्हायला हवा. महिलेच्या नावावर एन्काऊंटर करणं चुकीचं आहे आहे, असं वृंदा ग्रोवर म्हणाल्या.

संबंधित बातम्या

 

27 नोव्हेंबरला काय घडलं?
पोलिसांच्या माहितीनुसार, 27 नोव्हेंबरच्या रात्री महिला डॉक्टरचं ट्रक चालक आणि त्याच्या साथीदारांनी अपहरण केलं. आरोपी तरुणीला निर्जन स्थळी घेऊन गेले आणि तिला जबरदस्तीने दारु पाजली. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. एका आरोपीने तिचं तोंड आणि नाक दाबून तिचा जीव घेतला. यानंतर तिथून 27 किमी अंतरावर जाऊन पेट्रोल टाकून तिचा मृतदेह जाळला. तिच्या मृतदेहाशेजारीच फोन आणि घड्याळ लपवलं.