Karnataka High Court Hearing : हिजाब वादावर (Hijab controversy) कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दुपारी 2.30 वाजता सुनावणीला सुरुवात झाली. याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील रवि वर्मा कुमार (Ravi Verma Kumar) यांनी पुन्हा युक्तिवाद सुरू केला. ते म्हणाले की, शिक्षण कायद्यानुसार हिजाबवर बंदी आणण्यासाठी कोणताही नियम आणायचा असेल तर किमान एक वर्ष अगोदर त्याची माहिती पालकांना देणे आवश्यक आहे.


रवि वर्मा कुमार म्हणाले की,  या आदेशात इतर कोणत्याही धार्मिक चिन्हाचा विचार करण्यात आलेला नाही. फक्त हिजाबच का? त्यांच्या धर्मामुळे तर नाही ना? मुस्लिम मुलींशी होणारा भेदभाव हा पूर्णपणे धर्मावर आधारित आहे. सरकार फक्त हिजाबवरून मुद्दा का उचलून धरत आहे, असा युक्तिवादही त्यांनी केला. बांगड्या घालणाऱ्या हिंदू मुली आणि क्रॉस घातलेल्या ख्रिश्चन मुलींना बाहेर पाठवले जात नाही? असा प्रश्नही यावेळी वकिलांकडून विचारण्यात आला.


आजपासून कर्नाटकमध्ये प्री-युनिव्हर्सिटी आणि डिग्री कॉलेजही सुरू झाले
आजपासून कर्नाटकमध्ये प्री-युनिव्हर्सिटी आणि डिग्री कॉलेजही सुरू झाले आहेत. मुलींना हिजाब काढून वर्गात बसायला सांगितल्यावर अनेक भागातील विद्यार्थी आणि महाविद्यालयीन अधिकारी यांच्यात मारामारी झाल्याच्या बातम्या आल्या. दरम्यान, बागलकोट, बंगळुरू, चिक्कबल्लापुरा, गदग, शिमोगा, तुमकूर, म्हैसूर, उडुपी आणि दक्षिण कन्नडमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. याआधी मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली, तेव्हा कुंदापुरा महाविद्यालयातील मुस्लीम विद्यार्थ्यांची बाजू मांडणारे अधिवक्ता देवदत्त कामत यांनी हिजाब प्रकरण आणि तुर्की, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेतील न्यायालयांनी धर्माबाबत दिलेले निकाल यांची तुलना केली. 


काय आहे हिजाबचा वाद?


हिजाबचा वाद पहिल्यांदा उडुपीच्या कॉलेजमध्ये सुरू झाला जेव्हा 6 मुली हिजाब घालून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वर्गात पोहोचल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल काही लोक भगवे गमछे परिधान करून कॉलेजमध्ये आले. हळूहळू हा वाद राज्याच्या इतर भागात पसरला, त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये तणाव आणि अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. कर्नाटक व्यतिरिक्त हे संपूर्ण प्रकरण देशातील अनेक राज्यांमध्ये पसरले आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha