मुंबई : आपण या आधी ऑनलाईन फिशिंग बद्दल बरंच काही ऐकलयं पण कधी विशिंग हा शब्द ऐकलाय का? विशिंग हे फिशिंग प्रमाणेच असतं. विशिंगमध्ये भामटे हे आपल्या फोनमधून वैयक्तिक माहिती चोरतात. म्हणजे जसं यूजर आयडी, लॉगिन डिटेल्स, पासवर्ड, ओटीपी, यूआरएन, कार्ड पिन अशा प्रकारची संवेदनशील माहिती चोरली जाते. त्याचसोबत आपली इतरही संवेदनशील माहिती म्हणजे जन्मतारीख, आईचं नाव, पत्ता अशा प्रकारची सर्व डिटेल्स गोळा केली जाते.
या सर्व डिटेलचा वापर करुन हे भामटे संबंधित व्यक्तीला कॉल करतात आणि एखाद्या बँकेतील अधिकाऱ्याप्रमाणे बोलतात. आता एवढी सर्व डिटेल माहिती समोरच्याने सांगितली म्हणजे तो नक्कीच आपल्या बँकेतून असावा असाच विश्वास कुणालाही बसतो. मग त्यानंतर आपली इतर आर्थिक माहिती गोळा केली जाते. या सर्व माहितीच्या आधारे आपल्या बँक अकाऊंटमधून सर्व पैसे लांबवले जातात.
विशिंगपासून वाचण्यासाठी काय करावं?
आपल्याला अशा प्रकारचा संशयित कॉल आला आणि आपल्याला पर्सनल डिटेल्स विचारले जात असतील तर वेळीच सावध व्हा. कोणत्याही बँकेतून आपल्या ग्राहकांना पर्सनल डिटेल्स म्हणजे यूजर आयडी, पासवर्ड, सीव्हीव्ही, ओटीपी किंवा इतर प्रकारची माहिती विचारली जात नाही. जर अशा प्रकारचा कॉल आला तर माहिती देण्याचं नाकारा आणि याची तक्रार आपल्या बँकेच्या शाखेत करा.
अशा प्रकारची डिटेल विचारणा करणारा एसएमएस किंवा मेल जरी आला तरी त्याला रिप्लाय देऊ नका. खासकरून आपल्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डची माहिती विचारणा करणाऱ्या कोणत्याही मेल, मेसेज किंवा कॉलला रिप्लाय करु नका.
महत्वाचं म्हणजे अनेकजण आपल्या डेबिट कार्डचा फोटो किंवा क्रेडिट कार्डचा फोटो काहीतरी कामासाठी इतरांना व्हॉट्सअप वर टाकतात. पण काम झाल्यानंतरही तो फोटो तसाच फोनमध्ये राहतो. यावर खबरदारीचा उपाय म्हणून अशा प्रकारचा फोटो, किंवा सिव्हीव्हीचा फोटो टाकण्यापेक्षा इतर मार्गाचा अवलंब करावा, जेणेकरुन आपली कोणत्याही संवेदनशील माहितीचे संकलन राहणार नाही.
संबंधित बातम्या :