Har Ghar Tiranga Campaign: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्टपासून सोशल मीडियावरील अकाउंटवर प्रोफाइल फोटो म्हणून  राष्ट्रध्वज तिरंगाचा फोटो लावण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अनेकांनी प्रोफाइल फोटो म्हणून तिरंगा झेंडा ठेवला. तर, काहींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सोशल मीडियाच्या खात्यावर आक्षेप घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सोशल मीडियावरील प्रोफाइल फोटोवर तिरंगा झळकावला नाही. त्यावरून सुरू असलेल्या टीकेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उत्तर दिले आहे. 


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी टीकेला उत्तर देताना म्हटले की, अशा गोष्टींचे राजकीयकरण करणे टाळले पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हर घर तिरंगा आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांना पाठिंबा दर्शवला असल्याचे त्यांनी सांगितले. 


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जुलै महिन्यात सरकारी आणि खासगी संस्थांशी संबंधित असलेल्या संघटनांद्वारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात स्वयंसेवकांनी संपूर्ण सहभाग घेण्याचे आणि पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. सुनील आंबेकर यांना सोशल मीडियावर संघाच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिरंगा फोटो न लावल्याबद्दल विचारले असता त्यांनी ही चर्चा अयोग्य असल्याचे म्हटले. ते 'पीटीआय'सोबत बोलत होते. 


सुनील आंबेकर यांनी सांगितले की, या प्रकारच्या कार्यक्रमांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. अशा प्रकरणांचे राजकारण करणे चुकीचे आहे. त्यांनी कोणाचेही नाव न घेता म्हटले की,संघावर टीका करणारे, प्रश्न उपस्थित करणारी लोकं, पक्ष देशाच्या फाळणीसाठी जबाबगदार असल्याचे त्यांनी सांगितले. 


नेहरु यांचा फोटो


काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेते आणि समर्थकांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा राष्ट्रध्वज तिरंगासह फोटो सोशल मीडियावर प्रोफाइल फोटो म्हणून ठेवला आहे. यातून भाजपवर निशाणा साधला गेला असल्याची चर्चा सुरू आहे. काही काँग्रेस समर्थकांनी संघाचे सरसंघचालक गोळवळकर गुरुजी आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांचा फोटो तिरंगासह दाखवण्याचे आवाहन केले आहे. 


काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आरएसएस आणि सरसंघचालकांवर निशाणा साधताना लिहिले की, "आम्ही आमचे नेते नेहरूंचा डीपी हातात तिरंगा घेऊन लावत आहोत. पण पंतप्रधानांचा संदेश त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचला नाही, असे दिसते. ज्यांनी 52 वर्षे नागपुरातील मुख्यालयात ध्वज फडकावला नाही. ते पंतप्रधानांची आज्ञा मानतील का?" तर काँग्रेस नेते पवन खेरा यांनी लिहिले की, "संघांच्या लोकांनो, आता तरी तिरंग्याचा स्वीकार करा."


 






इतर महत्त्वाच्या बातम्या:


'भविष्यात तिरंग्याची जागा भगवा ध्वज घेऊ शकतो'; कर्नाटकच्या मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य