Rahul Gandhi : आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह  (Amit Shah) यांना घाबरत नाही. त्यांच्याविरोधात आमचा संघर्ष सुरू राहणार असल्याचे काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सांगितले. नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald Case) यंग इंडियाचे कार्यालय ईडीने सील केल्यानंतर त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही कुठेही जाणार नाही, सरकाराविरोधात संघर्ष सुरू होणार असल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेसकडून पाच ऑगस्ट रोजी देशभरात महागाईविरोधात आंदोलन होणार आहे. 


ईडीने बुधवारी यंग इंडियावर कारवाई केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी काँग्रेस मुख्यालय आणि सोनिया गांधी निवासस्थानजवळ मोठ्या संख्येने पोलीस तैनात केले. आज पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे लोकशाहीविरोधात काम करत आहेत. लोकशाहीच्या संरक्षणासाठी संघर्ष करत राहणार असल्याचे राहुल यांनी म्हटले. सरकारविरोधात लोकांच्या मुद्यावर आंदोलन करत राहणार असून सरकारला जे काही करायचे आहे ते त्यांनी करावे असे आव्हान राहुल यांनी दिले. 


ईडीची कारवाई


नॅशनल हेराल्ड प्रकरणात मोठी कारवाई करत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हेराल्ड हाऊस येथील यंग इंडियाचे कार्यालय सील केले आहे. मंगळवारी ईडीने या कार्यालयाची झडती घेतली होती. त्यानंतर बुधवारी हे कार्यालय सील करण्यात आले आहे. यंग इंडियन कंपनीचे 38 टक्के शेअर्स सोनिया गांधींकडे आहेत आणि तितकेच शेअर्स राहुल गांधींकडे आहेत. यंग इंडिया कंपनीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड म्हणजेच एजेएलचे ताबा घेतला होता.


सरकार राजकारण्यांना दहशतवादी मानते का:  सिंघवी


काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, ''पोलिस कारवाई करून सरकारला जनतेची दिशाभूल करायची आहे. महागाई आणि बेरोजगारी वाहिन्यांवर ठळक बातम्या बनवय नये, अशी सरकारची इच्छा आहे. ते म्हणाले, ''सरकार राजकारण्यांना दहशतवादी मानते का? सत्य बाहेर आणण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील राहील. लोकशाही मूल्ये जपण्यासाठी काँग्रेस लढत राहील.''