बंगळुरु : भविष्यात भगवा ध्वज तिरंग्याच्या जागी राष्ट्रध्वज म्हणून येऊ शकतो असं वक्तव्य कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री केएस ईश्वरप्पा (Karnataka Minister KS Eshwarappa) यांनी केलं आहे. ईश्वरप्पा यांच्या या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. बुधवारी माध्यमांशी बोलताना ईश्वरप्पा म्हणाले की भगवा ध्वज खरोखरच राष्ट्रध्वज बनू शकतो. त्यांनी म्हटलं की, आजपासून शंभर, दोनशे किंवा अगदी पाचशे वर्षांपूर्वी हा ध्वज होता. प्रभू श्रीराम आणि मारुतीरायांनी त्या काळात रथांवर भगवा ध्वज लावला नव्हता का? भविष्यातही असेच होऊ शकते असं ते म्हणाले. 


आम्ही अयोध्येत राममंदिर बांधू म्हटल्यावर लोक आमच्यावर हसले नाहीत का? आज आपण ते साध्य केले आहे, असंही ते म्हणाले. लाल किल्ल्यावर भगवा ध्वजही फडकवला जाईल. आम्ही सर्वत्र भगवा ध्वज फडकावू. आज ना उद्या भारत हिंदू राष्ट्र होईल, असंही ते म्हणाले. 


ईश्वरप्पा म्हणाले की, आता तिरंगा हाच राष्ट्रीय ध्वज आहे आणि जो कोणी त्याचा आदर करत नाही तो देशद्रोही आहे. 


कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी शिवमोग्गा येथील शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये भगवा झेंडा फडकावला असल्याचा आरोप केला होता. यावर मंत्री ईश्वरप्पा म्हणाले की, शिवकुमार यांचे आरोप खोटे आहेत. तिरंगा बदलण्यात आलेला नाही. जर कोणी तो बदलून भगवा ध्वज फडकावला तर तो गुन्हा आहे. पण इथे तसे घडले नाही, असं म्हणत शिवकुमार हे खोटारडे असल्याचं ते म्हणाले. 


हिजाबच्या विषयासंदर्भात बोलताना ईश्वरप्पा म्हणाले की, इतर कुठेही, कोणीही आपल्या इच्छेनुसार कपडे घालू शकतो. त्यांना कुणीही रोखत नाही. भाजप नेत्यांनी विद्यार्थ्यांना भगवी उपरणं वाटप करत असल्याच्या आरोपाबाबत बोलताना ईश्वरप्पा म्हणाले की, त्यांना कितीही भगवी उपरणी वाटण्याचा अधिकार आहे त्यासाठी शिवकुमारच्या परवानगीची गरज नाही.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha